शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात गुरुवारी (१ डिसेंबर) मुंबईत भाजपा नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी ठाकरे गटाने लोढांना इयत्ता चौथीचं इतिहासाचं पुस्तक भेट देत इतिहास वाचा असा खोचक टोला लगावला. तसेच जोपर्यंत भाजपाचे नेते छत्रपतींच्या अपमानाबद्दल पश्चाताप व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत उभ्या महाराष्ट्रात यापुढे भाजपाचा कुठलाही नेता फिरू शकणार नाही, असा थेट इशारा दिला.
अरविंद सावंत म्हणाले, “त्यांना महाराष्ट्राचा अपमान करायचा आहे. आता त्यांनी जे वक्तव्य केलंय त्याबद्दल त्यांना माफी मागावीच लागेल. मंगलप्रभात लोढा जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आज आम्ही लोढांना चौथीच्या इतिहासाचं पुस्तक भेट देत आहोत. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिलेला आहे. ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांना आम्ही इतिहास शिकवत आहोत.”
“गद्दारांची तुलना शिवाजी महाराजांशी केली”
“जेव्हा लोकांकडून संताप व्यक्त केला जातो तेव्हा हे आमच्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचं सांगतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी असंच म्हटलं की, राज्यपालांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. ते अनर्थ निर्माण करत आहेत. त्यांनी गद्दारांची तुलना शिवाजी महाराजांशी केली. व्हिडीओत ते स्पष्टपणे दिसत आहे,” असं अरविंद सावंत यांनी म्हटलं.
“हे आपल्याच राजाच्या पाठीत खंजीर खुपसारे गद्दार”
“ते म्हणतात, औरंगजेबाच्या दरबारातून आले. मात्र, हे आपल्याच राजाच्या पाठीत खंजीर खुपसारे गद्दार आहेत. गद्दार स्वाभिमानावर बोलण्यासाठी औरंगजेबाच्या दरबारात होते का?” असा सवालही सावंतांनी विचारला.
“…तोपर्यंत उभ्या महाराष्ट्रात यापुढे भाजपाचा कुठलाही नेता फिरू शकणार नाही”
अरविंद सावंत पुढे म्हणाले, “ते निर्लज्ज आहेत. त्यांना लाज वाटत नाही की, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्याची भाषा केली होती आणि आता त्यांचा अपमान करत आहेत. ते शब्दच्छल करत आहेत, शब्दांचे खेळ करत आहेत. जोपर्यंत भाजपाचे नेते छत्रपतींच्या अपमानाबद्दल पश्चाताप व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत उभ्या महाराष्ट्रात यापुढे भाजपाचा कुठलाही नेता फिरू शकणार नाही. त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील.”
हेही वाचा : CM शिंदेंची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंगलप्रभात लोढांविरुद्ध संभाजी ब्रिगेड आक्रमक; म्हणाले, “मूग गिळून…”
“भाजपाच देशात विभाजनवादी विचार प्रसारित करत आहे”
“भाजपाच देशात विभाजनवादी विचार प्रसारित करत आहे. हे देशाचं दुर्दैव आहे. भाजपा संविधानाच्या विरोधात पावलं उचलत आहे. देशाचे कायदामंत्री रिजूजू देशाच्या न्यायव्यवस्थेवर टीका करतात. हे सर्व संविधानाच्या विरोधात आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधीही सहन करणार नाही. आम्ही संतप्त आहोत. जोपर्यंत भाजपाचे लोक माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही. आमचं आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा अरविंद सावंत यांनी दिला.