खासदार अरविंद सावंत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
महाराष्ट्राच्या जडणघडणीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान असल्याने त्यांचा ‘राष्ट्रपुरुष’ म्हणून राजशिष्टाचारानुसार यथोचित सन्मान करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत त्यांनी पत्र पाठविले असून या मागणीसाठी लवकरच त्यांची भेटही घेणार असल्याचे सावंत यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
शासकीय पातळीवर राष्ट्रपुरुषांची यादी असून त्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य केलेल्या महात्मा गांधी, लोकमान्य टिळकांपासून माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आदींच्या नावांचा समावेश त्यात आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यावर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्याचा आणि त्यांचे छायाचित्र शासकीय कार्यालयात लावण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
‘सावरकरांना भारतरत्न द्या’
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
सावरकर हे हिंदुराष्ट्र समर्थक होते. त्यामुळे आधीच्या सरकारच्या कालावधीत त्यांची उपेक्षा झाली असून ती आताच्या सरकारने दूर करावी, असे पत्रात म्हटले आहे.