गेल्या तीन दिवसांपासून मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. अखेर आज सुनावणी पूर्ण झाली असून या तिघांनाही जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाच्या आदेशाची सविस्तर प्रत आणि ऑपरेटिव्ह उद्या प्राप्त होणार असल्यामुळे आजची रात्र देखील आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा तुरुंगातच राहणार आहेत. मात्र, तरीदेखील त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं असताना दुसरीकडे अरबाज मर्चंटचे वडील असलम मर्चंट यांनी त्याच्या सुटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
माझी पत्नी दिवस नाही, मिनीट मोजत होती!
मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचं स्पष्ट केल्यानंतर अरबाज मर्चंटचे वडील असलम मर्चंट म्हणाले, “बऱ्याच दिवसांपासून नाही मिनिटांपासून आम्ही वाट पाहात आहोत. ३५, ५६० मिनिटांपासून ही मुलं आतमध्ये आहेत. आर्यन देखील माझ्या मुलासारखाच आहे. माझी बायको मिनिटं मोजत होती”, असं ते म्हणाले आहेत.
“ही मुलं प्रचंड धक्क्यात आहेत”
दरम्यान, अरबाज मर्चंट, आर्यन खान आणि मुनमुन धमेचा हे तिघेही प्रचंड धक्क्यामध्ये आहेत, असं असलम मर्चंट म्हणाले. “त्यांची वेदना तुम्ही समजून घेतली पाहिजे. ही मुलं प्रचंड धक्क्यात आहेत. कल्पना करा जे लोक अजूनही तुरुंगात आहेत, ते किती धक्क्यात असतील. जेव्हा मूल भिंतीच्या त्या बाजूला असतं, तेव्हा कळतं वेदना काय असते. त्यामुळे व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होणं आवश्यक आहे”, असं असलम मर्चंट म्हणाले.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर अखेर आज आर्यन खान आणि त्याच्यासोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील आर्यन खानला आज तुरुंगातच राहावं लागणार आहे. आर्यन खानची बाजू उच्च न्यायालयात मांडणारे वकील मुकुल रोहतगी आणि सतीश मानेशिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत आर्यन खान तुरुंगाबाहेर येऊ शकतो.
आर्यन खानच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने दिलेल्या सविस्तर आदेशाची प्रत आणि त्याचा ऑपरेटिव्ह पार्ट उद्या हाती येणार आहेत. ते जेल प्रशासनाला दिल्यानंतरच आर्यन खानची सुटका होऊ शकणार आहे. आत्ताच जामीन मंजूर झाल्याचा निर्णय न्यायालयाने दिला असल्यामुळे ही कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो.