शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी हायकोर्टातून जामीन मिळाला आहे. आता याप्रकरणी मुंबई हायकोर्टाचा सविस्तर आदेश समोर आला आहे. आरोपीने हा गुन्हा करण्याची योजना आखली होती, हे स्पष्ट करणारा कोणताही पुरावा नसल्याचे हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
“आर्यन आणि अरबाज मर्चंट क्रूझवर स्वतंत्रपणे प्रवास करत होते, त्यांनी ड्रग्ज घेण्याची कोणतीही योजना आखल्याचा कोणताही पुरावा नाही. तसेच आर्यन खानच्या व्हाट्सअॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाकडे ड्रग्ज सापडले. ते विकण्याजोगे नव्हते. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन,अरबाज मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचे षडयंत्र रचल्याचं दिसून येत नाही”, अशी माहिती जामीन आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे.
“सर्व आरोपींनी समान हेतूने बेकायदेशीर कृत्य करण्यास सहमती दर्शविली हे सिद्ध करण्यासाठी कोणताही ऑन-रेकॉर्ड सकारात्मक पुरावा न्यायालयासमोर सादर केला गेला नाही.” असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. “अर्जदारांविरुद्ध कट रचल्याचा खटला सिद्ध करता यावा, यासाठी पुराव्याच्या स्वरूपात मूलभूत सामग्री असली पाहिजे, याबाबत न्यायालय संवेदनशील आहे.”, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.
“केवळ आर्यन आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा एकाच क्रूझवर होते, त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप होऊ शकत नाही. तसेच एनसीबी तपास अधिकाऱ्याने नोंदवलेल्या सर्व आरोपींच्या कबुली जबाबावर अवलंबून राहता येणार नाही, कारण ते बंधनकारक नाही”, असे मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या जामीन आदेशात म्हटले आहे.