चित्रपटसृष्टीचा किंग खान शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान सध्या अटकेत असून त्याला क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात आजही जामीन नाकारण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास दोन आठवड्यांपासून अटकेत असलेल्या आर्यन खानला अजून काही दिवस तुरुंगातच काढावे लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष न्यायालयामध्ये आर्यन खाननं दाखल केलेल्या जामिनासाठीच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर आज न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर आता आर्यन खानसमोर जामिनासाठी कोणते पर्याय असतील? पुढे काय कारवाई केली जाईल? याविषयी त्याच्या वकिलांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
उच्च न्यायालयात जाणार…
विशेष न्यायालयाने आर्यन खानला जामीन नाकारल्यानंतर आता या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचं आर्यन खानच्या वकिलांनी सांगितलं आहे. लवकरात लवकर ही याचिका दाखल केली जाईल, असं ते म्हणाले. आत्ता विशेष न्यायालयाने फक्त ऑपरेटिव्ह ऑर्डर दिली असून त्यासंदर्भातला सविस्तर आदेश हातात आल्यानंतर नेमकं जामीन नाकारण्यासाठी काय कारण देण्यात आलं आहे, हे समजू शकेल, असं देखील त्याच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे.
Aryan Khan case : आर्यन खानच्या अडचणीत वाढ; एनडीपीएस न्यायालयाकडून जामीन नाहीच
जामीन नाकारण्याचं कारण काय?
दरम्यान, आर्यन खानला नेमका जामीन का नाकारण्यात आला, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. यासंदर्भात न्यायालयानं फक्त जामीन नाकारला असून सविस्तर आदेशाची प्रत अद्याप प्राप्त झालेली नाही. ती प्रत हातात आल्यानंतर त्यावर सविस्तर विचार करता येईल, अशी प्रतिक्रिया आर्यन खानच्या वकिलांनी दिली आहे. दरम्यान, आर्यनच्या जामिनासाठी उद्या तातडीची सुनावणी होण्यासाठी आर्यन खानचे वकील प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कलम २९ मुळेच जामीन नाकारला गेला?
आर्यन खानवर कलम २९ अन्वये कारवाई करणं चुकीचं असल्याचं प्रतिपादन त्याच्या वकिलांनी केलं आहे. “आर्यन खानवरचे आरोप हे कमी मात्रेसाठीचे आहेत. त्यासाठी १ वर्षापर्यंतची शिक्षा असते. पण या प्रकरणात एनसीबीनं कलम २९ लागू केलं आहे. ते चुकीचं आहे. कदाचित याच कलमामुळे जामीन नाकारला गेला आहे”, असं ते म्हणाले.
…तर आर्यन खानची दिवाळीही तुरुंगातच!
आर्यन खानला जामिनासाठी अर्ज करण्यासाठी आणि त्यावर सुनावणी होऊन जामीन मंजूर होण्यासाठी पुढील १० दिवसांचा अवधी असेल. १ नोव्हेंबरपासून दोन आठवड्यांसाठी दिवाळीनिमित्त न्यायालयाचं कामकाज बंद असेल. या काळात सुट्टीकालीन न्यायालय जरी सुरू असलं, तरी तिथे नियमित न्यायालयातील प्रकरणं सुनावणीसाठी घेतली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे या १० दिवसांत आर्यन खानला जामीन मंजूर न झाल्यास त्याची दिवाळी देखी आर्थर रोड जेलमध्येच जाण्याची शक्यता आहे.