बॉलिवुडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खान गेल्या दोन आठवड्यांपासून तुरुंगात आहे. कॉर्डेलिया क्रूजवर एनसीबीनं २ ऑक्टोबरला टाकलेल्या छाप्यामध्ये आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा यांच्यासह इतर आरोपींना अटक केली. एनडीपीएस न्यायालयानं आर्यन खानला जामीन फेटाळल्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जामध्ये त्याच्याविरोधात एनसीबीनं केलेल्या आरोपांवर आर्यन खाननं खुलासा केला आहे. तसेच, जामीन नाकारण्यासाठी देण्यात आलेलं कारण देखील नाकारलं आहे. २६ ऑक्टोबरला आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असून त्याला जामीन मिळणार की तरुंगवास वाढणार, याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

आर्यन खाननं वकील सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये एनसीबीनं जामीन नाकारण्यासाठी दिलेल्या कारणांवर देखील खुलासा केला आहे. आर्यन खान प्रभावी व्यक्ती असल्यामुळे त्याला जामीन दिल्यास तो साक्षी-पुराव्यांशी छेडछाड करू शकतो, असा दावा एनसीबीनं केला होता. त्यावर “हा दावा पूर्णपणे निराधार असून कोणत्याही पुराव्यांशिवाय हे आरोप केले जात आहेत”, असं आर्यन खानचं म्हणणं आहे.

“प्रभावी व्यक्ती प्रभाव टाकेलच असं नाही”

“एखादी व्यक्ती प्रभावी असेल, म्हणजे ती तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल अशी कोणतीही शक्यता कायद्यामध्ये गृहीत धरण्यात आलेली नाही. या संदर्भात स्पष्ट आरोप असणं आवश्यक आहे. पण सध्याच्या प्रकरणात एनसीबीकडून करण्यात आलेल्या आरोपांना कोणताही सबळ पुरावा नाही”, असा दावा आर्यन खानकडून मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे.

“पप्पा, आम्हाला…”, आर्यन खानसोबत कैदेत असलेल्या अरबाझ मर्चंटची वडिलांना विनवणी!

Whatsapp चॅट्सचं काय?

आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट्सवरून एनसीबीनं काही माहिती गोळा केली आहे. त्यावरून या दोघांमध्ये ड्रग्जविषयी चर्चा झाल्याचं समोर आलं. त्यासोबतच इतर ड्रग्ज पेडलर्सच्या व्हॉट्सअॅप चॅट्समध्ये देखील आर्यन खानचं नाव आल्याचा दावा करण्यात आला आहे. २ तारखेला झालेल्या क्रूज पार्टीविषयी देखील व्हॉट्सअॅपवर चर्चा झाल्याचं एनसीबीकडून सांगण्यात आलं. या पार्श्वभूमीवर आर्यन खानकडून मात्र एनसीबीनी चुकीचा अर्थ लावल्याची भूमिका घेण्यात आली आहे.

“२ तारखेला कॉर्टेलियावर झालेल्या क्रूज पार्टीच्याही आधीचे व्हॉट्सअॅप चॅट्स आहेत. त्यामुळे त्यांचा थेट संबंध रेव्ह पार्टीशी जोडता येणार नाही”, असं जामीन अर्जात म्हटलं आहे. “एनसीबीनं कट रचल्याचा केलेला आरोप देखील चुकीचा आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा कट रचण्यासाठी त्या कटासाठीच्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीविषयी माहिती असणं आवश्यक असतं. यासोबतच, त्याबाबतचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सर्व सहभागी व्यक्तींची सहमती आवश्यक असते”, असं देखील याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

अनन्या पांडेच्या चौकशीनंतर NCBचा मोठा खुलासा; आर्यनसोबतच्या चॅटमधून समोर आली धक्कादायक माहिती

आर्यन खान आंतरराष्ट्रीय किंवा इतर कोणत्या ड्रग्ज रॅकेटचा सदस्य असल्याचा आरोप देखील याचिकेत फेटाळून लावण्यात आला आहे. “हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. त्यामुळेच आर्यन खानला त्या कलमांखाली अटक करण्यात आलेली नाही”, असं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.