गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आर्यन खान प्रकरण विशेष गाजत आहे. २ ऑक्टोबरला एनसीबीनं कार्टेलिया क्रूजवर छापा टाकून आर्यन खानसह ८ जणांना अटक केली. तेव्हापासून आर्यन खान अटकेत आहे. शाहरूख खानचा मुलगा या प्रकरणात गुंतल्यामुळे त्याची मोठी चर्चा आता देशभर होऊ लागली आहे. आर्यन खानला अटक झाल्यानंतर त्याच्यासोबत सेल्फी काढणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्याचं नाव किरण गोसावी असून आर्यन खानच्या प्रकरणात किरण गोसावीनं पंचाची भूमिका निभावली होती. मात्र, त्यानंतर किरण गोसावी फरार झाल्यामुळे त्याच्याबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे. या दरम्यान पुणे पोलिसांनी किरण गोसावीच्या मैत्रिणीला अटक केली आहे.

शेरबानो कुरेशी असं किरण गोसावीच्या मैत्रिणीचं नाव आहे. पुण्यामध्ये एका तरुणाला मलेशियात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून किरण गोसावी आणि त्याची मैत्रीण शेरबानो कुरेशी यांनी तब्बल ३ लाखांना गंडा घातला होता. या प्रकरणी चिन्मय देशमुखनं तक्रार केल्यानंतर पोलिसांनी किरण गोसावी आणि त्याच्या मैत्रिणीविरोधात लुकआऊट नोटीस काढली होती. त्यासंदर्भात कारवाई करत आज शेरबानो कुरेशीला अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणी फरासखाना पोलिस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये कसबा पेठ परिसरात राहणारा चिन्मय देशमुख हा नोकरीच्या शोधत होता. त्यावेळी त्याची किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांच्या सोबत ऑनलाईन ओळख झाली. या दोघांनी चिन्मयला मलेशियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावतो असे सांगितले. त्यावर त्याच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यानुसार चिन्मयने तीन लाख रुपये दिले. मात्र तरी देखील नोकरी बाबत काही सांगितले गेले नाही. त्यावर अखेर त्यांनी फसवणुक झाल्याची तक्रार दिली.

या तक्रारीच्या आधारे किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांना पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र त्याला दोघांनीही काही प्रतिसाद दिला नाही. त्यावर दोघा आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार किरण गोसावीची मैत्रीण शेरबानो कुरेशी हिला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, किरण गोसावीविरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आली आहे.

Story img Loader