केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कोर्डेलिया क्रूझवर पार्टी करण्यासाठी अंमलीपदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत आठ जणांना २ ऑक्टोबर रोजी अटक केली. मात्र त्यानंतर या छाप्यासंदर्भातील भाजपा कनेक्शनसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी काही धक्कादायक आरोप केले होते. त्यानंतर एनसीबीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. मात्र आता नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा या क्रूझवर एका भाजपा नेत्याचा मेहुणाही होता असा खळबळजनक दावा केलाय. इतकचं नाही तर यासंदर्भात पुरावे आपण शनिवारी घेणाऱ्या पत्रकार परिषदेत सादर करणार असल्याचं म्हटलंय.
एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी या कारवाईनंतर केलेल्या वक्तव्यावरुन नवाब मलिक यांनी ही शंका उपस्थित करताना याबद्दल मोठा खुलासा आपण करणार असल्याचं म्हटलं आहे. “समीर वानखेडे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितलं होतं की आम्ही आठ ते दहा जणांना अटक केलीय. मी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत असताना प्रश्न विचारलेले की एक अधिकारी जो संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवतो तो असं वक्तव्य कसं करु शकतो. एकतर आठ लोक असतील नाहीतर दहा. जर दहा लोक असतील तर दोन लोकांना सोडण्यात आलंय असं मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. त्याबद्दल उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. ज्या दोन लोकांना सोडण्यात आलं त्याबद्दल व्हिडीओसहीत पुरावे सादर करणार आहे,” असं मलिक म्हणाले आहेत.
नक्की वाचा >> प्रसारमाध्यमाकंडून प्रसिद्धी मिळावी म्हणून कारवाया करता का?; NCB चे समीर वानखेडे म्हणाले…
तसेच पुढे बोलताना ज्या दोन लोकांना सोडण्यात आलं, “त्या दोन लोकांपैकी एकजण हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा मेहुणा त्यामध्ये आहे. भाजपाच्या कोणत्या नेत्यांच्या सांगण्यावर त्यांना सोडण्यात आलं. समीर वानखेडे कोणाकोणाशी बोलत होते? असा प्रश्न निर्माण होत आहे,” असंही मलिक म्हणाले आहेत.
“त्या दिवशी वानखेडे यांनी सांगितलं होतं की क्रूझवरुन आठ ते दहा लोक पकडले गेले. याचा अर्थ ते दोन लोकांना सोडण्याच्या तयारीत होते. ते बोलताना आकडा बोलून गेले. जे दोन लोक सोडण्यात आलेत त्यांना एनसीबीच्या कार्यालयामध्ये दोन बॅगांसहीत घेऊन जाण्यात आलं. काही तासांनी दोन लोक आली आणि त्या दोघांना घेऊन गेले. या साऱ्याचे व्हिडीओ पुरावे मी उद्या सादर करणार आहे,” असं मलिक यांनी सांगितलं आहे.