गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार टीका सुरू केली होती. समीर वानखेडे या प्रकरणाचा तपास हेतुपुरस्सर विशिष्ट पद्धतीने करत असल्याची देखील टीका नवाब मलिक यांनी केली होती. त्यानंतर आता एनसीबीनं मोठा निर्णय घेतला असून समीर वानखेडेंकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला आहे. नवाब मलिक यांनी यासंदर्भात ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
यासंदर्भात नवाब मलिक यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ही तर फक्त सुरुवात आहे, असा इशारा दिला आहे. “समीर वानखेडेंना आर्यन खानच्या प्रकरणासोबतच एकूण ५ प्रकरणांच्या तपासातून हटवण्यात आलं आहे. अशी एकूण २६ प्रकरणं आहेत ज्यांचा तपास होणं आवश्यक आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी खूप काही करण्याची गरज आहे. आणि आम्ही ते करू”, असं ट्वीट नवाब मलिक यांनी केलं आहे.
समीर वानखेडे यांनी केलेला तपास आणि आर्यन खानवर केलेली कारवाई हा बनाव असून समीर वानखेडेंनी बॉलिवुड सेलिब्रिटींकडून वसुली केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. यासंदर्भात खूप सारे फोटो आणि व्हॉट्सअॅप चॅट्स देखील नवाब मलिक यांनी सातत्याने त्यांच्या पत्रकार परिषदांमधून जाहीर केले होते.
“मी मुस्लीम पद्धतीने विवाह केला कारण…”, नवाब मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडे म्हणाले…
आत्तापर्यंत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंकडून दुबई आणि मालदीवमध्ये सेलिब्रिटिंकडून वसुली, समीर वानखेडेंनी जातीचं प्रमाणपत्र दाखवून सेवेत निवड होण्यासाठी केलेला बनाव, समीर वानखेडे महागड्या वस्तू वापरतात असे अनेक आरोप केले आहेत. या आरोपांना वेळोवेळी समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि त्यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी प्रत्युत्तर देखील दिलं आहे. या आरोपांनंतर समीर वानखेडेंची विभागीय चौकशी देखील सुरू करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज त्यांच्याकडून या प्रकरणासोबतच इतरही काही प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला आहे.