संपूर्ण आर्यन खान प्रकरणाचे मास्टर माइंड सुनील पाटील असल्याचा आरोप भाजपा नेते मोहीत कंबोज यांनी केला होता. या आरोपांनंतर सुनील पाटील नेमके कोण आहेत आणि त्यांचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे? याची चर्चा सुरू झाली होती. सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य असल्याचा देखील दावा मोहीत कंबोज यांनी केला होता. त्यावर आता खुद्द सुनील पाटील यांनीच समोर येत या सर्व आरोपांवर उत्तर दिलं आहे. तसेच, त्या दिवशी घडलेला घटनाक्रम समोर ठेवला आहे. एबीपीशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला आहे.
मी मास्टरमाईंड नाही…
“यातला मास्टरमाईंड मी नाही. या केसमधले मास्टरमाईंड कुणीतरी वेगळेच आहेत. माझा मनीषशी संपर्क मित्र म्हणून गेल्या १०-१२ वर्षांपासून आहेत. मी मनीषसोबत कंपनीच्या एका कामासाठी २७ तारखेला अहमदाबादला गेलो होतो. किरण गोसावीसोबत मी बदली रॅकेटमध्ये आहे असं ते म्हणतात. पण मी किरण गोसावीला ४ सप्टेंबरपासून ओळखतो. म्हणजे घटनेच्या काही दिवस आधीपासून. तो माझ्या मित्राचा भाऊ आहे. २२ तारखेला माझी किरण गोसावीसोबत पहिली भेट झाली. त्यानंतर मी २५-२६ ला परत आलो. २७ ला मनीष भानुशालीने सांगितलं की अहमदाबादला जाऊ, काम आहे. त्यानंतर आम्ही अहमदाबादला गेलो”, असं सुनील पाटील यांनी सांगितलं.
याविषयीची टिप माझ्याकडे नव्हतीच!
सुनील पाटील यांनीच समीर वानखेडे यांना ड्रग्ज पार्टीविषयीची टिप दिल्याचा दावा मोहीत कंबोज यांनी केला होता. त्यावर बोलताना सुनील पाटील यांनी हे आरोप फेटाळले आहेत. “मला अजिबात याविषयीची टीप मिळाली नाही. ही टीप मनीष भानुशालीकडे होती. त्याचा मित्र धवल भानुशाली आणि नीरज यादव यांनी संध्याकाळी ४ वाजता मला फोन केला होता. मनीष भानुशाली आणि किरण गोसावी, नीरज यादव तेव्हा गांधीनगर मंत्रालयात गेले होते. त्यांनी सांगितलं की कॉर्टेलिया क्रूजवर रेव्ह पार्टी होणार आहे. तुमचे एनसीबीचे काही काँटॅक्ट असतील, तर द्या. तेव्हा मी त्यांना सांगितलं की माझं हे काम नाही. तुमचं तुम्ही बघून घ्या”, असं पाटील म्हणाले.
कोण आहे नीरज यादव?
दरम्यान, किरण गोसावीसोबत सुनील पाटील यांना फोन करणारा नीरज यादव हा भाजपाचा कार्यकर्ता असल्याचं सुनील पाटील यांनी सांगितलं आहे. “नीरज यादव मध्य प्रदेशमधला भाजपाचा कार्यकर्ता आहे. तो मोठमोठ्या नेत्यांच्या संपर्कात असतो. त्याने कैलास विजयवर्गीयांचं नाव घेतलं होतं. त्यांचे फोटोही त्याने मला व्हॉट्सअॅप केले होते”, असं सुनील पाटील म्हणाले.
“त्यांचा मला फोन आला की आमची बोलणी सुरू आहेत”
सॅम, मनीष भानुशाली आणि के. पी. गोसावी यांनी शाहरुख खानच्या मॅनेजरसोबत काही डील केली होती का? या प्रश्नावर पाटील यांनी त्याचा घटनाक्रम सांगितला. “त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते रात्रभर मुंबईत होते. मी ४ तारखेपर्यंत अहमदाबादलाच होतो. त्यांचा मला एकदा फोन आला की आमची बोलणी चालू आहेत. मला मनीषने सांगितलं की शाहरुख का लडका भी है.. मग मी म्हटलं तुम्ही बघून घ्या जे काही करायचंय ते करा”, असं पाटील म्हणाले.
“त्या दिवशी त्यांच्या बैठका सुरू होत्या. सकाळी साडेआठला मला फोन आला की आमची डील झाली आहे, ५० लाख रुपये टोकन दिलं आहे. किरण गोसावी मला म्हणाला की कुठे ठेऊ. मी राहातो वाशीला, पण इथे पैसे ठेवायला जागा आहे का? तेवढंच माझं आणि प्रभाकरचं बोलणं झालं. प्रभाकरला पैसे मिळाले, त्याने कुठे ठेवले याविषयी मला काहीही माहिती नाही”, असं देखील पाटील यांनी सांगितलं.
होय, मी राष्ट्रवादीत होतो…
दरम्यान, नवाब मलिक यांनी सुनील पाटीलचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला असताना त्यांनी मात्र आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो असं सांगितलं आहे. “मी १९९९ ते २०१६ या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होतो. त्यानंतर मी राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त झालो”, असं त्यांनी सांगितलं.
“मी मयूर घुलेला कधीही प्रत्यक्ष भेटलेलो नाही. सॅन्युअल आणि मयूर घुले हे मित्र आहेत. मयूर घुलेही तेव्हा तिथे होता. त्याचा रात्री १२ वाजता फोन आला की सॅमने सांगितलं की काम झालेलं नाही, पैसे परत द्या. मग मी किरण गोसावीला शिव्या घातल्या आणि म्हटलं की ते पैसे परत कर”, असं सुनील पाटील म्हणाले.
सॅम डिसूजाशी काय संबंध?
“मी वर्षभरापूर्वी सॅम डिसोजाच्या संपर्कात आलो. त्याला वर्षभरापूर्वी ओळखतही नव्हतो. तो माझ्या एका मित्राच्या माध्यमातून आमच्याकडे यायला लागला. त्याला ४ महिन्यांपूर्वी एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणात समन्स पाठवलं होतं. माझ्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये ते समन्स अजूनही आहे. तो एनसीबीकडे स्टेटमेंट देऊन आला होता. त्याने मला सांगितलं की मला एनसीबीला पैसे द्यायचे आहेत . २५ लाख रुपये द्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी त्याने फोन केला की मी एनसीबीला पैसे दिले आणि सुटलो आहे”, असं ते म्हणाले.