मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणात महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर जामिनावर सुटका झालेल्या आर्यन खाननं पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आता त्याला जामीन देताना घालून दिलेल्या अटींमध्ये शिथिलता हवी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दर शुक्रवारी न्यायालयात हजेरी लावण्यापासून आर्यन खानला सुटका हवी आहे. यासाठी आर्यन खाननं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर एनसीबी उत्तर दाखल करणार असल्याची देखील माहिती मिळते आहे.

अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला २ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या एनसीबी शाखेनं अटक केली होती. आर्यन खानसोबत एकूण ८ जणांना अटक करण्यात आली होती. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना २८ ऑक्टोबर रोजी न्यायालयानं जामीन मंजूर केला. मात्र, जामीन देताना दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली. त्यानुसार सुटका झाल्यापासून आर्यन खान दर शुक्रवारी एनसीबी मुंबईच्या कार्यालयात हजेरी लावत आहे.

कारण काय?

दरम्यान, उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना आर्यन खाननं एनसीबी कार्यालयाबाहेर होणाऱ्या गर्दीचं कारण दिलं आहे. जेव्हा आर्यन खान कार्यालयाजवळ पोहोचतो, तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर माध्यमं हजर असतात. बघ्यांची देखील गर्दी होते. यावेळी पोलिसांना त्याला गर्दीतून वाट काढत कार्यालयात आणि नंतर कार्यालयातून बाहेर काढावं लागतं, असं आर्यनच्या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींची यादी जाहीर, सिद्धार्थ शुक्ला पहिल्या, तर आर्यन खान कितव्या क्रमांकावर?

आर्यन खानच्या अटकेवेळी हजर असणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना संशयास्पद भूमिकेचा आक्षेप घेत या प्रकरणावरून बाजूला सारण्यात आलं आहे. हा तपास आता दिल्ली एनसीबीचं विशेष तपास पथक हाताळत असून पुढील चौकशी सुरू आहे.

Story img Loader