प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने (NCB) क्रुझ शीप ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट दिली. एनसीबीने आर्यन खानसह सहा जणांची नावं आरोपपत्रातून वगळली आहेत. तसेच या प्रकरणी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी एनसीबीने आर्यन खानला क्लीन चिट का दिली या प्रश्नाचं उत्तर दिलं. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी व्हॉट्सअप चॅटचा उल्लेख करत केवळ व्हॉट्सअप चॅटवरून सबळ पुरावे गोळ करता आले नाहीत, अशी माहिती दिली. दरम्यान आर्यनला दोषमुक्त करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर या प्रकरणात छापेमारीपासून ते चौकशीपर्यंत सर्वच टप्प्यांमध्ये नेतृत्व करणारे एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी पहिली प्रितिक्रिया दिलीय.
नक्की वाचा >> आर्यन खान सुटला समीर वानखेडे अडचणीत सापडले; अमित शाहांच्या मंत्रालयाने दिले वानखेडेंविरोधात कारवाईचे आदेश
एनसीबीने आज नेमकं काय सांगितलं?
“या प्रकरणाचे तीन भाग आहेत. पहिला भाग मुंबई एनसीबीने दाखल केलेला गुन्हा आणि त्यांचा तपास. दुसरा भाग म्हणजे काही वाद आणि अनियमितता समोर आल्यानंतर एसआयटीने संजय सिंग यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला. त्यांच्या तपासात १४ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं जाऊ शकतं आणि ६ जणांविरोधात पुरेसे पुरावे न मिळाल्याने आरोपपत्र दाखल करता येणार नाही, असं समोर आलं,” असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
“तिसरा भाग ‘व्हिजलन्स प्रकरणाचा’ आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी करून त्यांच्याकडून पुरावे गोळा केले जातील. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय षडयंत्राची बाब सिद्ध होऊ शकलेली नाही. एनसीबी केवळ व्हॉट्सअप चॅटच्या आधारे सबळ पुरावे गोळा करू शकली नाही,” असंही एनसीबीने सांगितलं.
समीर वानखेडे काय म्हणाले?
प्रसारमाध्यमांनी आर्यनला क्लीन चीट देण्यात आल्यासंदर्भात विचारणा केली असता समीर वानखेडेंनी प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यांनी पत्रकारांना सॉरी असं म्हटलं. “सॉरी, मी आता एनसीबीमध्ये नाही, त्यामुळे या विषयावर बोलू शकत नाही. यासाठी तुम्ही एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी बोला,” अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
६००० पानांचे आरोपपत्र दाखल
या प्रकरणात आतापर्यंत एनसीबीने १० व्हॉल्यूमचे ६००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान आणि महककडे ड्रग्ज सापडलं नव्हतं. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी एकूण १४ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. मात्र, चौकशीत ६ आरोपींविरोधात पुरावे मिळाले नसल्याचं एनसीबीने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये सांगितलं आहे. तसेच या ६ जणांची नावं आरोपपत्रातून वगळ्यात आली आहे.
पुरावे न मिळाल्याने आरोपपत्रातून वगळण्यात आलेले ६ जण कोण?
१. आर्यन खान
२. अविन शुक्ला
३. गोपाल आनंद
४. समीर साईघन
५. भास्कर अरोरा
६. मानव सिंघल
नेमकं प्रकरण काय?
‘एनसीबी’ने २ ऑक्टोबर २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर कारवाई केली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आली होती. यावेळी काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.
या प्रकरणी ‘एनसीबी’ने या क्रूझवर आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दिवसभर वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला, नवी मुंबईसह आणखी काही ठिकाणी शोधमोहीम राबवून संशयित अमली पदार्थ विक्रेत्यांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणी आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एनसीबीने आर्यनसोबत इतर सात जणांनाही ताब्यात घेतले होते. एनसीबीने आर्यन खानची कसून चौकशी केली होती. त्याच्यासोबतच अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा या सर्वांचीही एनसीबीने चौकशी केली होती. या चौकशीनंतर आर्यन खानसह दोघांना अटक करण्यात आलं होतं.