बॉलिवुडचा किंग खान शाहरुखला सगळ्यात मोठा दिलासा मिळाला असून त्याचा मुलगा आर्यन खानला २५ दिवस आर्थर रोड जेलमध्ये घालवल्यानंतर जामीन मिळाला आहे. आज आर्यन खानची आर्थर रोड जेलमधून सुटका झाली आहे. त्याला जामिनावर सोडण्यात आलं असून मुंबई उच्च न्यायालयानं १४ अटी देखील आर्यन खानला पाळण्यास बजावलं आहे. या पार्श्वभूमीवर खान कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण आपल्या मुलाला तुरुंगातून परत आणण्यासाठी शाहरुख खाननं आपल्या सर्वात विश्वासू बॉडिगार्ड रवी सिंहला पाठवलं होतं. रवी सिंह गेल्या अनेक वर्षांपासून शाहरुखसोबत असून तो शाहरुखचा सर्वात विश्वासू बॉडिगार्ड असल्याचं सांगितलं जात आहे. पण हा रवी सिंह कोण आहे, याची चर्चा आर्यन खान प्रकरणाच्या अनुषंगाने सुरू झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी असो किंवा एनसीबी कार्यालयातील चौकशी असो, रवी सिंह अनेकदा या ठिकाणी दिसून आला आहे. त्यामुळे आज तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर आर्यन खानला घ्यायला रवी सिंह आल्याचं पाहताच शाहरुखच्या लेखी त्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
रवी सिंह गेल्या साधारणपणे १० वर्षांपासून शाहरुख खानसोबत त्याचा बॉडिगार्ड म्हणून वावरतो आहे. एखाद्या सावलीप्रमाणे रवी सिंह शाहरुख खानसोबत असतो. १३ ऑक्टोबर रोजी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी मुंबईच्या सत्र न्यायालयात आली असताना देखील रवी सिंह तिच्यासोबत होता.
बॉलिवुडमधला सर्वात महाग बॉडिगार्ड?
शाहरुख खानचा सर्वात विश्वासू असण्याबरोबरच रवी सिंह बॉलिवुडमधला सर्वात महाग बॉडिगार्डपैकी एक असल्याचं बोललं जातं. रवी सिंहला शाहरुख खान एका वर्षाला तब्बल २ कोटी ७ लाख रुपये पगार देत असल्याची माहिती देखील काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती.
शाहरुखसोबतच कुटुंबाच्याही सुरक्षेची जबाबदारी!
रवी सिंह हा शाहरुखच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रमुख आहे. त्याच्यावर शाहरुखसोबतच त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचीही जबाबदारी आहे. आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचं देखील काम रवी सिंग करतो. शाहरुख खानचं पूर्ण दिवसाचं वेळापत्रक रवी सिंहकडे असतं. तो प्रत्येक वेळी शाहरुखसोबत असतो.
२०१४मध्ये रवी सिंह सापडला होता अडचणीत!
दरम्यान, २०१४मध्ये रवी सिंह एका अडचणीत सापडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, रवी सिंहला वांद्रे पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं. मात्र, काही तासांनी त्याला सोडून देण्यात आलं. एका पुरस्कार सोहळ्याच्या वेळी शाहरुखसोबत आलेला असताना रवी सिंहनं मराठी अभिनेत्री शर्वरीला हटकलं होतं. शर्वरीकडे व्हीआयपी पास असूनदेखील तिच्याशी रवी सिंहचा वाद झाला होता. गर्दी नियंत्रित करण्यासाठी त्यानं शर्वरीला हटकल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या प्रकरणात त्याला समज देऊन सोडण्यात आलं होतं.