सिनेअभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. २८ ऑक्टोबर रोजी आर्यन खानची जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर दर शुक्रवारी आर्यन खानला एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याचं बंधन जामिनातील अट म्हणून घालण्यात आलं होतं. आता त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानला सूट दिली असून दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. यासंदर्भात आर्यन खाननं न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले आहेत.

काय असतील नियम?

दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याच्या नियमातून आर्यन खानला सूट देण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली एसआयटीनं ज्या ज्या वेळी आर्यन खानला चौकशीसाठी पाचारण केलं, त्या त्या वेळी त्याला चौकशीसाठी हजर व्हावं लागेल, अशी अट न्यायालयानं घालून दिली आहे. त्यासोबतच आर्यन खानला मुंबईतून बाहेर जायचं असेल, तर त्यासाठी तपास अधिकाऱ्यांना माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

काय होती आर्यन खानची मागणी?

एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्यासाठी जाताना त्या ठिकाणी मोठ्या संख्येने माध्यम प्रतिनिधी आणि लोकांची गर्दी होते, अशी तक्रार आर्यन खाननं याचिकेमध्ये केली होती. अशा वेळी पोलिसांनाच आर्यन खानला कार्यालयाच्या आत आणि कार्यालयातून बाहेर घेऊन जावे लागते. या गोष्टीचा त्रास होत असल्याचं आर्यन खाननं याचिकेत म्हटलं होतं. त्यावर आज उच्च न्यायालयाने सुनावणी घेत आदेश दिले आहेत.

Story img Loader