अयोध्येतील बहुप्रतिक्षित राम मंदिराचा लोकार्पण सोहळा लवकरच होणार आहे. २२ जानेवारी रोजी भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याआधीच देशभरातील अनेक रामभक्त अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. तसंच, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरही रामभक्तांची गर्दी वाढणार आहे. यानिमित्ताने मुंबईतील नागरिकांना अयोध्येत जाता यावं याकरता मुंबई ते अयोध्या अशी रेल्वे सुरू करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सहा नवीन वंदे भारत गाड्यांचे लोकार्पण आज (३० डिसेंबर) करण्यात आले. यात महाराष्ट्राला मिळालेली जालना ते मुंबई ही सातवी वंदे भारत ट्रेन असून आज सकाळी पंतप्रधानांच्या हस्ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. जालना ते मुंबई वंदे भारत ट्रेन आजपासून सुरू करण्यात आली. यावेळी वंदे भारत ट्रेनचे प्लॅटफॉर्म १८ येथे आगमन होताच ट्रेनचे स्वागत करण्यात आले. गाडीचे मोटरमन आणि प्रवाशांचे याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. रेल्वेची १ लाख ७ हजार कोटींची कामे महाराष्ट्रात सुरू आहेत. त्याबद्दल माननीय पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.

यावेळी त्यांनी मुंबई ते अयोध्या अशी ट्रेन सुरू करण्याची मागणीही रेल्वे मंत्रालयाकडे केली. ते म्हणाले, अयोध्येत येत्या २२ जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिराचे लोकार्पण होत असून या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तसेच तिथे जाता यावे अशी अनेक राम भक्तांची मागणी आहे. त्यासाठी मुंबईहून अयोध्येला लवकरात लवकर ट्रेन सुरू करावी अशी मी महाराष्ट्र आणि मुंबईकरांच्या वतीने मागणी करतो.

हेही वाचा >> जालना-मुंबई वंदे भारतच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थी स्थानकावर; भाजपा आणि शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन, वंदे भारतचे महाराष्ट्र कन्येकडून सारथ्य

ढोल ताशांच्या गजरात एक्स्प्रेस रवाना

‘भारत माता की जय’ चा नारा, ढोल-ताशांचा गजर अशा थाटात जालना – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे शनिवारी दुपारी पावणेतीनला मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात जल्लोषात स्वागत करण्यात आले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नागपूर येथून ऑनलाईन प्रणालीद्वारे तर मनमाड स्थानकातून भुसावळ मंडळ रेल्वे प्रंबधक इती पांडेय, आमदार नरेंद्र दराडे यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी भाजपा, शिवसेना, पदाधिकारी-कार्यकर्ते, रेल्वेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. रेल्वेच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थ्यांना स्थानकावर आणण्यात आले होते. त्यांना या रेल्वेतून प्रवास घडला नाही. पण स्वागत गीत म्हणावे लागले.

हेही वाचा >> अब्जाधीश उद्योगपतीचा मुंबई लोकलमधून प्रवास; VIDEO पोस्ट करत म्हणाले, “उल्हासनगरपर्यंतचा प्रवास…”

महाराष्ट्राच्या कन्येचा गौरव

‘वंदे भारत’ मनमाड स्थानकात येताच सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते या गाडीची लोकोपायलट महाराष्ट्राची कन्या कल्पना धनवटे यांनी. ‘वंदे भारत’या गाडीचे सारथ्य करण्याची जबाबदारी पहिल्याच दिवशी कल्पनावर आली. तीने कौशल्याने गाडी चालवली. उपस्थितांनी कल्पनाचा गौरव केला.