७०० कोटींची जमीन हडपल्याचा आरोप
दिल्ली बलात्कार प्रकरणात मुक्ताफळे उधळणारे स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्यावर आता ७०० कोटी रुपये किंमतीची जमीन हडपल्याचे बालंट येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील या जमीनप्रकरणी भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणांचा तपास करणाऱ्या संस्थेने (एसएफआयओ) आसाराम यांच्यावर खटला दाखल करण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागितली आहे.
मध्य प्रदेशातील रतलाम येथे असलेली २०० एकर जमीन जयंत व्हिटॅमिन्स लिमिटेड या कंपनीच्या मालकीची आहे. मात्र, ७०० कोटी रुपये किंमतीची ही जमीन आसाराम यांनी २००० पासून वापरायला सुरुवात केली. विशेष म्हणजे कंपनीने या प्रकरणी कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केलेली नाही. परंतु कंपनीच्या एका भागधारकाने आसाराम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाला पाठवले आहे.
जागेचे मूळ मालक असलेली जयंत व्हिटॅमिन्स ही कंपनी आधी फार्मास्युटिकल कंपन्यांना ग्लुकोज व व्हिटॅमिन्सचा पुरवठा करायची. मात्र, २००४ मध्ये ही कंपनी दिवाळखोरीत निघाली. मुंबई शेअर बाजारात यादीनिर्दिष्ट असलेल्या या कंपनीला त्यानंतर यादीतून काढूनही टाकण्यात आले.

Story img Loader