मी देशद्रोह केलेला नाही. त्यामुळे तो आरोप मागे घेतला जात नाही, तोपर्यंत मी जामीन घेणार नाही वा वकील घेणार नाही, असे स्पष्ट करीत राजकीय व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी याने सोमवारी जामीन नाकारला. पोलिसांनी त्याच्या पोलीस कोठडीची सध्या काही आवश्यकता नसल्याचे सांगितल्यानंतर वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्याला २४ सप्टेंबपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
असीमला भादंविच्या कलम १२४ नुसार देशद्रोह, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-ए आणि राष्ट्राचा अपमान प्रतिबंधक कायद्याच्या कलम २ अंतर्गत शनिवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी त्याला सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळेस त्याला १६ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र सोमवारी त्याला वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता पोलिसांनी त्याची चौकशी पूर्ण झाली असून आणखी कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने असीमला २४ सप्टेंबपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्या वेळी जामीनासाठी त्याला विचारणा करण्यात आली. मात्र मी देशद्रोह केलेला नाही. त्यामुळे हा आरोप मागे घेतला जात नाही, तोपर्यंत जामीन घेणार नाही, असे त्याने स्पष्ट केले. त्रिवेदीला न्यायालयात आणण्यात आले तेव्हा त्याच्या शेकडो समर्थकांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती.
दरम्यान, असीमने लिहिलेल्या कथित चिठ्ठीच्या प्रतींचे न्यायालयाबाहेर ‘इंडिया अगेन्सट करप्शन’च्या कार्यकर्त्यांनी वाटप केले. या चिठ्ठीत असीमने, मला जामीन नको कारण मी जे काही केले त्याबाबत मला अभिमान आहे आणि हे मी वारंवार करेन. पैसे भरून जामीन घ्यायला मी गुन्हेगार नाही. माझ्यावरील देशद्रोहाचा आरोप मागे घेतला जाईपर्यंत मी तुरुंगातच राहीन, असे म्हटले आहे. अण्णांच्या आंदोलनात काढलेल्या व्यंगचित्रामुळे असीमविरुद्ध भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांने तक्रार केली होती. त्यानंतर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा