Asha Bhosle On Ladki Bahin Yojana: “लाडक्या बहिणींना महायुती सरकारनं जे १५०० रुपये दिले आहेत, त्यामागचा आनंद माझ्यापेक्षा इतर कुणाला कळणार नाही. हेच काम जर १९४७ साली कुणी केलं असतं. तर मी दोन वेळचं जेवले असते. सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं. कारण दुपारी मी जेवत नव्हते. माझे पती सायंकाळी आल्यानंतर आम्ही दोघं मिळून जेवत होतो”, अशी अतिशय भावनिक आठवण महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारमधील मंत्र्यांसमोर सांगितली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘अभिजात मराठी सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आशा भोसले यांनी लाडकी बहीण योजनेचं कौतुक करताना त्यांच्या आयुष्यातील खडतर दिवसांची माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशा भोसले पुढे म्हणाल्या, “आजच्या काळात कोटी, लाख यांची चर्चा होते. पण ज्या महिलांकडे जेवणासाठी थोडे पैसे नसतात त्यांच्यासाठी १५०० रुपये ही मोठी रक्कम असून महायुती सरकारने त्यांच्यासाठी मोठं काम केलं आहे. मी संगीत क्षेत्रात असले तरी मी एक गृहिणी आहे. एका महिलेला घरात जे काम करावं लागतं, ती सर्व कामं मी करते. घरातलं काम करता करता, मुलांना मोठं केलं. भोसले कुटुंब सांभाळलं. हे करता करता कधी ९२ वर्षांची झाले, हे ही कळलं नाही. कधी उपाशी राहून तर कधी जे आहे ते खाऊन दिवस काढले. पण कधीच कुणासमोर हात पसरले नाहीत. हाच माझा गुरुमंत्र होता.”

भारत खूप मोठा देश आहे. इथे अनेक भाषा, परंपरा आहेत. देशातील सर्व लोक आपले आहेत. मराठी आणि ही जन्मभूमी माझ्यासाठी स्वर्गासमान असली तरी मला सर्व भाषा प्रिय आहेत, असंही आशा भोसले यावेळी म्हणाल्या.

मोदीजी, तुम्ही एवढा मोठा भारत कसा सांभाळता?

“माझं घर सांभाळता सांभाळता मला इतर काहीच सांभाळता आलं नाही. मला राजकारणही समजलं नाही. म्हणून मला पंतप्रधान मोदींना एक प्रश्न विचारायचा आहे. ‘एवढा मोठा भारत तुम्ही कसा काय सांभाळता?’ आम्ही तर आमचं घरही सांभाळताना थकून जातो. प्रत्येकाच्या घरात आज जेवण शिजतंय, प्रत्येकाच्या घरात वीज आहे. हे सर्व तुम्ही केलं. मी तुमच्यापेक्षा वयानं मोठी आहे. मी तुम्हाला आशीर्वाद देते. तुम्ही याच पद्धतीने काम करत रहा. आपला देश तुमच्या हातात राहो. तुमचे सहकारीही चागंले काम करत राहो”, असेही आशा भोसले यावेळी म्हणाल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asha bhosle praise ladki bahin yojana front of pm narendra modi get emotional kvg