मुंबई : गोंदियातील अदासी गावात मुसळधार पाऊस पडत होता. गावातील आशा कार्यकर्ती वंदना निखाडे यांचा चार वर्षाचा मुलगा घरात तापाने फणफणत होता. मुलाच्या डोक्यावर त्या थंडपाण्याच्या पट्ट्या ठोवून ताप उतरविण्याचा प्रयत्न करत होत्या. रात्रीचे एक वाजून गेले होते. अचानक दरवाजावर थापा वाजू लागल्या. वंदाना यांनी दरवाजा उघडताच एका मुलाने जवळत्या गावात बाळंतपणासाठी एक महिला अडली असल्याचे सांगितले. घरात मुलगा तापाने फणफणत होता आणि दुसरीकडे एक महिला बाळंतपणासाठी मदतीचा हात मागत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काळजावर दगड ठेवून वंदना यांनी आपल्या तेरा वर्षांच्या मुलीला बोलावून घेतले व मुलाच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवण्यास सांगून सुमारे सव्वा किलोमीटरवर असलेल्या नवीनतारा गावात जाऊन गर्भवती महिलेला तपासले आणि रिक्षात घालून जवळच्या उपकेंद्रावर नेण्यासाठी निघाले. बाहेर प्रचंड पाऊस पडत होता. समोरचा रस्ता दिसत नव्हता. प्रसुतीच्या वेदना लक्षात घेऊन वाटेतच रिक्षा थांबवायला सांगून वंदना यांनी रिक्षातच त्या महिलेची प्रसुती पार पाडली. जन्माला आलेले बाळ काहीच हालचाल करत नव्हते. तेव्हा जे काही शिक्षण मिळाले होते ते पणाला लावून बाळाला वंदाना यांनी तोंडावाटे श्वास दिला. पाठीवर थोपटले तोच बाळ रडू लागले. त्या महिलेला व बाळाला घेऊन त्या आरोग्य विभागाच्या उपकेंद्रात पोहोचल्या. तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने नाळ कापून आवश्यक ते उपचार केले आणि बाळ व आई या दोघांचाही जीव वाचला. आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक यांच्यासमोर त्यांनी हे अनुभव कथन केल्यानंतर सचिव निपुण यांनी वंदाना यांचे कौतुक तर केलेच शिवाय स्वत: बरोबर एक छायाचित्रही काढून घेतले.

गडचिरोली, गोंदिया, वर्धासह नागपूर विभागाच्या दुर्गम भागातील आरोग्य सेवेतील आशांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी आपण केलेल्या चांगल्या कामांचे अनुभव कथन केले. निमित्त होते आरोग्य सचिव निपुण विनायक तसेच विरेंद्र सिंग यांनी आयोजित केलेल्या अनुभवकथन बैठकीचे. खरेतर सचिव निपुण विनायक यांनी गडचिरोलीचा दौरा केला त्यानंतर नागपूर येथे विदर्भातील दुर्गभ भागातील आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या तळातील आशा तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांसह संबधित अधिकाऱ्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यातूनही त्यांनी केलेले चांगले काम व त्यांना काय अधिकच्या सुविधा मिव्ल्या पाहिजेत, यासाठी एक बैठक आयोजित केली होती. यात आशांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अडचणीत वा प्रतिकूल परिस्थित आपण केलेल्या कामांचे सादरीकरण केले. यात दुर्गम भागातील आरोग्य विभागाचे प्ररणादायी काम लोकांसमोर यावे तसेच यातून आणखी माणसे घडावीत तसेच या तळातील काम करणाऱ्यांना नेमक्या भेडसावणाऱ्या अडचणी त्यांच्याच मुखातून समोर आणण्याचे काम आरोग्य सचिव निपुण विनायक यांनी केले. ही एक आगळी वेगळी संकल्पना असून असा उपक्रम यापूर्वी कोणीही केला नसल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. वंदाना निखाडे यांना विचारले असता एवढ्या मोठ्या साहेबांनी दोनदोनदा माझा अनुभवकथन करायला लावले व माझ्याबरोबर फोटो काढला याचेच हिच मोठी गोष्ट असल्याचे सांगितले.

या कार्यशाळेत मानवी संवेदनांना समजून घेऊन विविध घटकांना आलेले अनुभव संवादाच्या माध्यमातून समजून घेण्याचे हे प्रात्यक्षिक होते. परंतु या उपक्रमाची कुणालाही कल्पना नव्हती. आरोग्य सेवेत कार्य करणारे प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, आशा अशा विविध घटकांना या कार्यशाळेत सामावून घेण्यात आले. या कार्यशाळेत आपण केलेल्या कामाचा आढावा घेऊन चुकांसाठी बोलणे खावे लागेल ही तयारी ठेवूनच सर्वजण आले होते. गेल्या अनेक वर्षातील अनुभव असाच होता. मंत्री वा उच्चपदस्थ अधिकारी गडचिरोली वा दुर्गभ भागात भेटीसाठी येतात. पाहाणी करतात आणि चांगल काम करायचे आदेश देऊन निघून जातात. प्रसंगी तळातील अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या धमक्याही दिल्या जातात हाच या आरोग्य सेवेतील मंडळीचा अनुभव होता. आरोग्य सचिव निपुण विनायक व विरेंद्र सिंह यांनी याला छेद दिल्यामुळे आपल्या कामांचीही कोणीतरी दखल घेते ही सुखद संवेदना या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली.

कार्यशाळेच्या सुरुवातीला सर्वांचा परिचय झाला व आरोग्य सेवेतील विविध घटकांना पद, उपाधी बाजूला करून प्रत्येक गटामध्ये समाविष्ट करून प्रत्येकासाठी एक कार्ड देण्यात आले व या कार्डवर सेवा काळातील आलेल्या उत्कृष्ट अनुभवाची व स्मरणात राहिलेल्या अनुभवाची नोंद करण्यास सांगण्यात आले व गटानुसार त्या त्या गटातील प्रत्येक व्यक्तीला आपले अनुभव कथन करण्याविषयी सांगण्यात आले. यात पद आणि भूमिका या बाबी बाजूला ठेवून सर्वांनी यात सहभागी होण्याविषयी आवाहन करण्यात आले. त्याप्रमाणे सर्वांनी आपले पद आणि भूमिका बाजूला ठेवून प्रत्येकाच्या कार्याविषयी व आलेल्या अनुभवाविषयी त्या त्या गटात चर्चा केली व एक तासाच्या अंतराने प्रत्येक गटाला आलेले अनुभव व त्यांनी साठवून ठेवलेल्या अंतर्मनातील अनुभव, आठवणी सर्वांसमोर मांडण्याची संधी देण्यात आली. यात आशा, परिचारिका, डॉक्टर, स्वयंसेवी संस्था यांनी त्यांचे कौशल्य पणाला लावून निभावलेल्या कर्तव्याचे व भूमिकांचे दर्शन त्यांच्या अंतर्मनातील अनुभवातून मांडले.

अटीतटीच्या प्रसंगी आपल्या सेवा काळात घडलेल्या कार्याचे व समाज भावनेतून महत्त्वपूर्ण भूमिका आपण कशी पार पाडू शकलो, याचा अनुभव कथन करण्यासाठी या व्यासपीठावर संधी मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि सेवाभाव ठळकपणे बोलण्यातून जाणवत होता. सार्वजनिक आरोग्य क्षेत्र हे व्यापक असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात दुर्गम भागात तसेच उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधांचा विचार करता या सुविधा पुरविताना अनेक अडीअडचणी येतात व त्या अडचणींवर मात करीत दुर्गम भागातील आरोग्य सेवेतील प्रथम स्थानी लढणारी ही मंडळी आपली भूमिका बिकट परिस्थितीतही जबाबदारीने पार पाडून अनेकांचे जीव वाचवतात. त्यांच्या आरोग्य विषयक अडचणींना दूर करण्यासाठी मोलाची मदत करतात. नागपूर विभागातील अतिदुर्गम भागात सेवा प्रदान करताना त्यांना आलेले अनुभव मांडण्यासाठी या कार्यशाळेतील व्यासपीठ महत्त्वाचे ठरले. आरोग्य सचिवांचा हा उपक्रम आमच्यात एक सकारात्मक उर्जा निर्माण करून गेल्याचे आशा व डॉक्टरांचे म्हणणे आहे.

याबाबत सचिव निपुण विनायक यांना विचारले असता, दुर्गम वा अतिदुर्गम भागातही आमच्या आशा व डॉक्टर तसेच अन्य आरोग्य कर्मचारी प्रतिकूल परिस्थितही उत्तम काम करत असल्याचे दिसून आले. हिच मंडळी आरोग्य यंत्रणेचा खरा कणा आहेत. त्यांच्या कामातून अनेकांना प्रेरणा घेता येईल असे काम दुर्गम भागात आरोग्य सेवेत काम करणारी ही मंडळी करत असतात. त्यांचे काम ऐकताना मीही भारावून गेलो. दुर्गम भागात आरोग्य सेवा अधिक बळकट करताना तेथे काम करणाऱ्या आशा व डॉक्टरांना अधिक चांगल्या सुविधा कशा मिळतील याकडे मी लक्ष देणार आहे. प्रथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य सेवा बळकट होण्याला माझे प्राधान्य असेल असेही निपुण विनायक यांनी सांगितले.