मुंबई : आशा स्वयंसेविकांना बोनस द्यावा, कामावर आधारित मोबादला दर वाढविण्यात यावा, ऑनलाईन कामाची सक्ती करू नये, २०२२ पासून नियुक्त केलेल्या आशा स्वयंसेविकांना मानधन द्यावे, मुंबई महानगरपालिकेच्या आशांना एनएचएममधील आशांएवढे मानधन द्यावे, स्टेशनरी, मोबाइल रिचार्ज, गणवेश व योजनेच्या कामासाठी नवीन मोबाइल देण्यात यावा, तसेच आशा या महापालिकेच्या कर्मचारी नाहीत हे ओळखपत्रावरील शब्द वगळण्यात यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि मुंबई महानगरपालिकेतील आशा स्वयंसेविका १ नोव्हेंबरपासून मुंबई महानगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.
हेही वाचा >>> मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर समाज माध्यांवरील २९ आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आशा स्वयंसेविकांना ११ हजार रुपये बोनस दिला जातो. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेतील आशा सेविकांनाही बोनस मिळावा यासाठी गतवर्षी दिवाळीपूर्वी मुंबईतील आरोग्य सेविकांइतका बोनस देण्याचा प्रस्ताव सादर करूनही त्यांना बोनस देण्यात आला नाही. वाढत्या महागाईनुसार आशा स्वयंसेविकांचे कामावर आधारित मोबदल्याचे दर वाढविण्यात आले नाहीत. हे दर वाढविण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेकडे विचाराधीन आहे. या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्यात यावी. नोव्हेंबर २०२२ पासून मुंबई महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या बहुसंख्य आशांना मानधनच मिळाले नाही. महानगरपालिकेतर्फे नेमणूक केलेल्या आशा सेविकांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत आशा स्वयंसेविकांप्रमाणे काम असल्याने त्यांना त्यांच्याप्रमाणे मानधनही देण्यात यावे. स्टेशनरी, मोबाइल रिचार्ज, गणवेश व योजनेच्या कामासाठी नवीन मोबाइल देण्यात यावा. त्याचप्रमाणे आशा सेविकांच्या ओळखपत्रावरील ‘हे महापालिकेचे कर्मचारी नाहीत’ हे शब्द वगळण्यात यावे, या मागण्यांसाठी आशा सेविकांकडून १ नोव्हेंबरपासून दुपारी १ वाजता आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी दिली.