मुंबई : कोकणातील नाणार येथील प्रस्तावित देशातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प पाकिस्तानातील ग्वादरला होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाला विरोध करून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्ष मदतच केल्याचा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी केला आहे.
या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्को कंपनीने तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली असून सामंजस्य करारही झाला आहे. ठाकरे यांनी या प्रकल्पाला सातत्याने विरोध करून देशाचे मोठे नुकसान केल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.
तेलशुद्धीकरण प्रकल्प भारताला मिळू नये, यासाठी काही आंतरराष्ट्रीय शक्ती कार्यरत होत्या. नाणारविरोधी आंदोलनात त्यांचा सहभाग होता का किंवा विरोधकांशी हातमिळवणी होती का, असा सवाल शेलार यांनी केला आहे.