मुंबई महापालिकेच्या हद्दीतील ४०० किलोमीटर रस्त्यांच्या कामात ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी सतत केला आहे. आज ( १३ मार्च ) आदित्य ठाकरेंनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. यावरून भाजपा आमदार आशिष शेलार आणि आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. गेल्या २५ वर्षातील रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी केली.
विधानसभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईतील ४०० किलोमीटर रस्त्यांच्या कामासाठी ६ हजार ८० कोटी रूपयांचा खर्च होणार आहे. मात्र, पावसाळ्याच्या पूर्वी ही कामं सुरू होणार का? किंवा पूर्ण होतील का? कामं सुरू झाली नाहीतर आगाऊची रक्कम देऊ नये. कंत्राटदारांना ४८ टक्के अधिकची रक्कम आणि १८ टक्के जीएसटी हा विषय कसा घडला? याकडे अर्थमंत्र्यांनी लक्ष द्यावे.”
हेही वाचा : राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती? जयंत पाटलांनी समोर आणली मोठी चूक; म्हणाले, “आता…”
“महापालिकेने सांगितलं होतं, जिथे-जिथे रस्त्यांची कामं सुरू होतील, तेथील सीसीटीव्ही फुटेज आणि माहिती मिळेल. मात्र, अद्यापही याला सुरूवात झाली नाही. ते कधीपासून सुरू होणार?,” असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
याला आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “४८ टक्क्यांचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कंपन्या मुंबई शहरात आल्या. एखाद्या विशिष्ट कंपनीला काम मिळालं नाही. त्यामुळे ही पोटदुखी होत आहे. हे राजकारण आहे. भ्रष्टाचारी कंपनीला काम मिळाले नसल्यानेच ही पोटदुखी होत आहे.”
हेही वाचा : वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी, शिंदे गटात जाणार? म्हणाले…
“मात्र, आम्ही चर्चेस तयार आहोत. रस्त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल २५ वर्षाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी. गेल्या २५ वर्षात १२ हजार कोटी रूपये रस्त्यांवर खर्च झाले आहेत. त्याची चौकशी होऊन जाऊद्या,” अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.