राहुल गांधी जाणूनबुजून सावरकरांचा अपमान करत आहेत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान काँग्रेस करत आहे. शिवसेना सत्तेसाठी माती खात असून, केवळ बोटचेपी भूमिका घेत इशारे देण्याचे काम करत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी यांनी मणिशंकर अय्यर यांना जोडे मारले होते. ‘भारत जोडो यात्रेत’ राहुल गांधींना झप्पी मारणारे आदित्य ठाकरे गप्प का? राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध का करत नाही, असा प्रश्न भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
आशिष शेलार भाजपा प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. “मराठी माणूस, देशभक्त नागरिक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना माफ करणार नाही. तुमचं राजकारण आणि महाविकास आघाडी तुम्हाला लखलाभ राहो. शिवसेनेने महाराष्ट्र धर्म निभावत, निर्णय घ्यावा,” असेही शेलार यांनी म्हटलं.
हेही वाचा : “राहुल गांधी सत्यच बोलले, एकेकाळी सावरकर…”; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी केली पाठराखण!
“राहुल गांधी जाणूनबुजून अशी वक्तव्य करत आहेत. कारण, त्यांना महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान करायचा आहे. त्यांना जुन्या इतिहासावर मीठ चोळायचे आहे. राहुल गांधींना इतिहासाची माहिती असेल तर, एका मंचावार सावरकरांच्या देशभक्तीवर चर्चा करू. भाजपाचे नेते राहुल गांधींना उघड पाडल्याशिवाय राहणार नाही,” असे आव्हानही शेलार यांनी दिलं.