Ashish Shelar Orders BJP Workers in Shivadi constituency : शिवडी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा दिला आहे. शिवडीत मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना आपला पाठिंबा असल्याचं मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी जाहीर केलं आहे. शेलार यांनी मंगळवारी (५ नोव्हेंबर) शिवडीतील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना सांगितलं की “तुम्ही मनसेचं इंजिन हे निवडणूक चिन्ह घराघरांत पोहोचवावं. मनसेसाठी, बाळा नांदगावकर यांच्यासाठी कंबर कसून प्रचार करा”. याआधी भारतीय जनता पार्टीने मनसेचे माहीम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमित ठाकरे यांनादेखील पाठिंबा जाहीर केला आहे. अमित ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आहेत. अमित ठाकरे आमच्या घरातीलच मुलगा असून आम्ही त्याच्यासाठी प्रचार करू अशी भूमिका आशिष शेलार व विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशिष शेलार म्हणाले, “पाठिंब्याबद्दल बाळा नांदगावकर किंवा मनसेने आपल्याला बोलण्याची वाट न पाहता आपण स्वतःहून त्यांचा प्रचार करू. स्वइंजिनाप्रमाणे आपण प्रचारात उतरू. मनसेचं स्वतःचं इंजिन (निवडणूक चिन्ह) आहेच. मी स्वइंजिनाबद्दल बोलतोय, म्हणजेच आपलं इंजिन. आपण मतदारांपर्यंत पोहोचायचं, मनसेचं चिन्ह पोहोचवायचं. लोकांमध्ये जाऊन समस्त महाराष्ट्राच्या हितासाठी, प्रगतीसाठी या (शिवडी) मतदारसंघातून मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणू. त्यासाठी तुम्हा सर्वांना कंबर कसावी लागेल”.

हे ही वाचा >> राहुल यांच्या ‘गॅरंटी’आधी महायुतीची ‘दशसूत्री’, कोल्हापूरच्या सभेत आश्वासनांचा पाऊस; मविआची आज मुंबईत सभा

शिवडी मतदारसंघात बाळा नांदगावकरांचा सामना शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार व विद्यमान आमदार अजय चौधरी यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात महायुतीने उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे महायुती बाळा नांदगावकरांच्या पाठिमागे आपली ताकद उभी करेल, यात शंका नाही.

अमित ठाकरे महायुतीचे उमेदवार : आशिष शेलार

गेल्या आठवड्यात आशिष शेलार म्हणाले होते, “अमित ठाकरे यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे, असं मला वाटतं. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी बोलणार आहे. ते यासंदर्भात निर्णय घेतील. यात महायुतीमध्ये कोणताही मतभेद नसला तरी यामुळे एक वेगळ्या पद्धतीचे महाराष्ट्राच्या संस्कृतीला एका अर्थाने जपता येईल असं नातं आपण दाखवलं पाहिजे. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाही. ते महायुतीचे उमेदवार आहेत, महायुती म्हणून निर्णय करावा हे माझं म्हणणं आहे”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा >> Abu Azmi : अबू आझमींचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून जंगी स्वागत, शाखेत बसून नागरिकांशी संवाद; शिवसैनिक प्रचार करणार

भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी : प्रसाद लाड

भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले, अमित ठाकरे हा आमच्या कुटुंबातील मुलगा आहे. तो पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. अमित ठाकरे राज ठाकरेंचा मुलगा असला तरी आम्ही त्याला आमच्या मुलासारखाच समजतो आणि या निवडणुकीत आम्ही राज ठाकरे यांना मदत करावी यावर ठाम आहोत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish shelar bjp supports bala nandgaonkar in shivadi assembly election 2024 asc