मुंबई : कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाच्या अनुवादाला दिलेला पुरस्कार रद्द केल्याने काही साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्यास सुरुवात केल्याने त्यांचे नक्षलवादाला प्रोत्साहन आहे का, असा सवाल मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी केला आहे.
राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात काही साहित्यिकांनी आवाज उठविला असून काहींनी शासकीय पुरस्कार परत करण्यास सुरुवात केली आहे, तर काहींनी शासकीय समित्यांचे राजीनामे दिले आहेत. यासंदर्भात बोलताना शेलार म्हणाले, या पुस्तकामध्ये नक्षलवादाचे समर्थन करण्यात आले असून ते सरकारला मान्य नाही, असे कारण सरकारने पुरस्कार रद्द करताना दिले आहे व ते योग्यही आहे. त्यामुळे जे या निर्णयावर आक्षेप घेत आहेत, त्यांना नक्षलवादाचे समर्थन करायचे आहे का? याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शरजिल उस्मानी याला राज्यात फिरविण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवू नये, असे शेलार यांनी स्पष्ट केले.