मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपाने निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. मागील काही दिवसांपासून भाजपाचे नेते मुंबईमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दोन वेळा मुंबईचा दौरा केला आहे. पालिका निवडणूक लक्षात घेता येथे ठाकरे गट आणि शिंदे गट-भाजपा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुंबईतील विकासकामे आणि भाजपाच्या नगरसेवाकांना दिला जाणारा निधी यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर कठोर शब्दांत टीका केली आहे. आदित्य ठाकरेंनी चर्चेसाठी समोर यावे, असे थेट आव्हानच शेलार यांनी दिले आहे.
हेही वाचा >>>> लोकसभेसाठी भाजपा तिकीट देणार का? रक्षा खडसे म्हणाल्या, “पक्षाने दुसऱ्यांना तिकीट…”
भाजपाच्या ८२ नगरसेवकांना निधी वाटपात सापत्न वागणूक
मुंबई महापालिकेतील विकासकामे तसेच भाजपाच्या नगरसेवकांना दिला जाणारा निधी, या मुद्द्यांना घेऊन आशिष शेलार यांनी एक खास ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. ‘गेली ५ वर्ष मुंबईकरांनीच निवडून दिलेल्या ८२ भाजपाच्या नगरसेवकांना निधी वाटपात कारभाऱ्यांनी सापत्न वागणूक दिली. निधीचे कोट्यवधीचे लोंढे मानखुर्द, गोवंडी, मोहम्मद अली रोड आणि मालवणीकडे वेगाने वाहत गेले. भाजपाच्या ८२ नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये मुंबईकर राहत नव्हते काय?’ असा सवाल आशिष शेलार यांनी केला.
हेही वाचा >>>> “ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले?” भाजपाचा सुप्रिया सुळेंना सवाल!
आदित्य ठाकरे यांनी चर्चेला यावे, आमचे खुले आव्हान
‘५ वर्षात ८२० कोटींचा अन्याय केला. त्या ताळेबंदाचा समतोल करुन मुंबईकरांचा अनुशेष कमी केला जातोय. आता महापालिकेतील ‘माजी कारभाऱ्यांना’ पोटशूळ येऊ नये. अन्याय झाला म्हणून त्यांनी कोल्हेकुई करु नये. आदित्य ठाकरे यांनी चर्चेला यावे, आमचे खुले आव्हान आहे,’ असे आशिष शेलार म्हणाले.
हेही वाचा >>>> “अजित पवार सांगण्याचा प्रयत्न करत होते, केंद्रात भाजपाचं सरकार असून…”, भाजपा मंत्र्यांचं मोठं विधान
दरम्यान, मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे राजकारण तापले आहे. भाजपा आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील जवळजवळ प्रत्येक कार्यक्रमात मुंबईत सुरू असलेल्या विकासकामांचा आवर्जुन उल्लेख करत आहेत. मुंबईत रस्ते बांधणी, सुशोभिकरणाचे काम वेगाने केले जात आहे, असे एकनाथ शिंदे सांगत आहेत. याच कारणामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.