महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असून, त्यामुळे मुंबई शहरातील धोकादायक व पुनर्विकास रखडलेल्या उपकर प्राप्त (सेस) इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सातत्याने प्रयत्न केले होते. आता या नव्या कायद्यानुसार विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले किंवा रखडलेले उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रकल्प म्हाडामार्फत ताब्यात घेऊन त्यांचा पुनर्विकास करणे, यामुळे शक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलारांनी आज पत्रकारपरिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीसांचे आणि शिंदे-फडणवीस सरकाराचे मुंबईकरांच्यावतीने व मुंबईतील भाडेकरुंच्यावतीने आभार व्यक्त केले.
“सेस इमारतीमधील मालकांची दादागिरी संपवली, भाडेकरूंच्या पुनर्विकासाचा मार्ग सरकारी राजमार्गाने मोकळा केला म्हणून मुंबईकरांचा आणि विशेषता भाडेकरूंचा हा दिवाळीचाच दिवस असावा, म्हणून मी देवेंद्र फडणवीस यांचे पाठपुरावा केल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो.” असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
याशिवाय, “सेस इमारतीमधील विकासाला जी वर्षानुवर्षे खीळ पडली होती, त्या समस्येतून दूर करण्याचं काम शिंदे-फडणवीस सरकारने केलं आणि त्यासाठी विशेषकरून देवेंद्र फडणवसींनी पाठपुरावा केला आणि राष्ट्रपतींची अनुमती मिळवून नवीन कायदा आला. मी तर म्हणेण मुंबईतल्या चाळकऱ्यांसाठी एका अर्थाना हा दिवाळीचा सण व्हावा असा हा निर्णय आहे.” असंही यावेळी शेलार म्हणाले.