भाजपा आमदार आशिष शेलार यांनी वरळी मतदारसंघातील प्रश्नांवरून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलीय. आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिकेचे १८ हजार कोटी रुपये खर्च करून समुद्राचं पाणी गोड करायला निघालेत, पण स्वतःच्या मतदारसंघात स्मशानभूमीकडे दुर्लक्ष का? असा सवाल आशिष शेलार यांनी केलाय. स्मशानभूमीचं काम देणगीतून केलं जातंय, मग पालिकेचे पैसे कुठल्या कंत्राटदाराला द्यायला निघालात? असा प्रश्नही त्यांनी विचारलाय.
आशिष शेलार म्हणाले, “मुंबई महानगरपालिकेवर २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. असं असूनही पर्यावरण मंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीच्या स्मशानभूमीची स्थिती अतीशय बिकट आहे. हे जनतेला त्रास देणारं आहे. ही व्यवस्था करण्यासाठी देणगीच्या माध्यमातून खासगी व्यावसायिक आणि खासगी संस्थांकडून त्याचा विकास होत आहे. सुशोभिकरण आणि इतर व्यवस्था निर्माण केल्या जात आहे.”
“पालिकेचे पैसे कुठल्या कंत्राटदाराला द्यायला निघाला आहात का?”
“आदित्य ठाकरे महापालिकेचे १८ हजार कोटी रुपये घेऊन समुद्राचं पाणी गोड करायला निघाले, दुसऱ्याच्या मतदारसंघाला निधी द्यायला निघालात आणि स्वतःच्या वरळी मतदारसंघात स्मशानभूमीकडे दुर्लक्ष का? वरळीतील स्मशानभूमीचं काम देणगीतून केलं जातंय, मग महानगरपालिकेचे पैसे कुठल्या कंत्राटदाराला द्यायला निघाला आहात का? म्हणून स्वतःच्या ताटाखाली अंधार अशी त्यांची अवस्था आहे,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं.
“उद्धव ठाकरेंची आजची शिवसेना निर्माल्य झालीय”
आशिष शेलार पुढे म्हणाले, “बाळासाहेबांची शिवसेना वेगळी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना वेगळी पडलीय का असं वाटतंय. बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत भाजपाची युती ज्वाजंल्य हिंदुत्वाची सुवर्ण फुले होती. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तीच हिंदुत्वाची ज्वाजंल्य सुवर्ण फुले निर्माल्य वाटत आहे. बाळासाहेबांसोबतची आमची युती वैचारिक युती होती. मात्र, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २५ वर्षे सडल्यासारखं वाटतं. म्हणून ही ही शिवसेना निर्माल्य झालीय.”
“आम्ही कारसेवा करत होतो तेव्हा तुम्ही कोठे होता?”
“हिंदुत्ववादी कोण हा प्रश्न विचारायचा असेल तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला विचारावं लागेल की आम्ही कारसेवा करत होतो तेव्हा तुम्ही कोठे होता? ३७० कलमाच्या विरोधात लढा देण्यासाठी नरेंद्र मोदी सुद्ध काश्मीरमध्ये लाल चौकात जाऊन भारताचा झेंडा लावत होते तेव्हा तुम्ही कोठे होता? ज्यावेळी युद्धाचा प्रसंग आला त्यावेळी तुम्ही कोठे होता? हा प्रश्न शिवसेनेला विचारावा लागेल. आजच्या शिवसेनेने याचं उत्तर द्यावं,” असं मत शेलार यांनी व्यक्त केलं.
“आता संजय राऊत यांची बोबडी का वळली?”
मंत्री अस्लम शेख मालाडमध्ये टिपू सुल्तान मैदानाचं उद्घाटन करणार आहे. यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, “आपल्या संस्कृतीचा आणि हिंदुत्वाचा विसर पडला की सत्तेसाठी लाचारी म्हणजे काय करावं लागतं याचं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उत्तर देण्याची गरज आहे. टिपू सुल्तानाच्या नावाने वास्तू उभी राहत आहे. ज्याने याकुब मेननचं समर्थन केलंय तो मंत्री ही वास्तू उभी करतोय. ती व्यक्ती पालकमंत्री आहे. आता संजय राऊत यांची बोबडी का वळली? आता भूमिका घ्या.”
“जुनं कार्टून शेअर करण्यामागे संजय राऊत यांचा हेतू काय?”
संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांचं कार्टून शेअर केल्याच्या मुद्द्यावर शेलार म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांचं कार्टून जुनं आहे. ते कार्टून आज मुद्दाम प्रसारित करणं यामागे शिवसेनेच्या संजय राऊत यांचा हेतू काय आहे? कार्टून हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. याला आमचा विरोध नाही. मात्र, कार्टूनवरून टीका करायची आणि त्यावरून राग आला तर पळून जायचं. हे संजय राऊत यांचं कोणतं कर्तुत्व आणि कर्तव्य आहे?”
हेही वाचा : “राम मंदिराची थट्टा ते याकुब मेननची फाशी”, उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणत आशिष शेलारांचे ७ सवाल
“कार्टूनवरून समन्यायी भूमिका घ्यायची असेल तर तुमच्यावरील कार्टून कुणी व्हॉट्सअपवर पाठवलं तर नौदलाच्या अधिकाऱ्याचे डोळे फोडणार. दुसऱ्याबाबत मात्र तुम्ही कार्टून पोस्ट करणार. संजय राऊत दुटप्पी भूमिका घेऊ नका. प्रमोद महाजनांच्या पायाजवळ पोहचण्याची सुद्धा तुमची अजूनही योग्यता आलीय का हा आमचा प्रश्न आहे,” असं मत आशिष शेलार यांनी व्यक्त केलं.