शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा-शिवसेना युती गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यामुळे झाल्याचं म्हणत आता मुंडे-महाजन यांची पुढची पिढी कुठंय? असा सवाल केला. यावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेचा जन्म १९६६ ला आणि संजय राऊत यांचा १९६१ ला झाला. राऊत स्वतःला कधीपासून शिवसेनेचे इतिहासाचार्य म्हणायला लागले? असा खोचक सवाल आशिष शेलार यांनी विचारलाय. ते मुंबईत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
आशिष शेलार म्हणाले, “संजय राऊत यांनी कधीतरी खुल्या चर्चेला यावं. आम्हाला कुणाच्या वयावरून किंवा जन्मवर्षावरून टीका करायची नाही. पण तुम्ही केली म्हणून सांगतो, शिवसेनेचा जन्म १९६६ ला आणि संजय राऊतांचा जन्म १९६१ चा आहे. तुम्ही स्वतःला शिवसेनेचे इतिहासाचार्य कधीपासून म्हणायला लागले? अभ्यास करायचा असेल, चर्चा करायची असेल तर या, आम्ही तयार आहोत.”
“शिवसेनेच्या पुढच्या पिढीने स्वार्थासाठी युतीत मीठ टाकलं”
“हे खरं आहे की गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ही युती टिकवली. शिवसेनेच्या पुढच्या पिढीने स्वार्थासाठी त्यात मीठ टाकलं. ते नेते कोण हे संजय राऊत यांनी सांगावं,” असंही आशिष शेलार यांनी म्हटलं.
“…तेव्हा संजय राऊत यांची बोबडी का वळली?”
मंत्री अस्लम शेख मालाडमध्ये टिपू सुल्तान मैदानाचं उद्घाटन करणार आहे. यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, “आपल्या संस्कृतीचा आणि हिंदुत्वाचा विसर पडला की सत्तेसाठी लाचारी म्हणजे काय करावं लागतं याचं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उत्तर देण्याची गरज आहे. टिपू सुल्तानाच्या नावाने वास्तू उभी राहत आहे. ज्याने याकुब मेननचं समर्थन केलंय तो मंत्री ही वास्तू उभी करतोय. ती व्यक्ती पालकमंत्री आहे. तेव्हा संजय राऊत यांची बोबडी का वळली? आता भूमिका घ्या.”
“जुनं कार्टून शेअर करण्यात संजय राऊत यांचं कोणतं कर्तुत्व आहे?”
“बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांचं कार्टून जुनं आहे. ते कार्टून आज मुद्दाम प्रसारित करणं यामागे शिवसेनेच्या संजय राऊत यांचा हेतू काय आहे? कार्टून हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. याला आमचा विरोध नाही. मात्र, कार्टूनवरून टीका करायची आणि त्यावरून राग आला तर पळून जायचं. हे संजय राऊत यांचं कोणतं कर्तुत्व आणि कर्तव्य आहे?” असा सवाल शेलार यांनी विचारला.
हेही वाचा : “…तेव्हा संजय राऊत यांची बोबडी का वळली?”, आशिष शेलार यांचा सवाल
“कार्टूनवरून समन्यायी भूमिका घ्यायची असेल तर तुमच्यावरील कार्टून कुणी व्हॉट्सअपवर पाठवलं तर नौदलाच्या अधिकाऱ्याचे डोळे फोडणार. दुसऱ्याबाबत मात्र तुम्ही कार्टून पोस्ट करणार. संजय राऊत दुटप्पी भूमिका घेऊ नका. प्रमोद महाजनांच्या पायाजवळ पोहचण्याची सुद्धा तुमची अजूनही योग्यता आलीय का हा आमचा प्रश्न आहे,” असंही शेलार यांनी म्हटलं.