राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर काल आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही औरंगजेब हा काही हिंदूद्वेष्टा नव्हता, असं विधान केलं होतं. दोघांनी केलेल्या या विधानांनंतर भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, भाजपाचे नेते अशिष शेलार यांनीही ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्र सोडले.
काय म्हणाले आशिष शेलार?
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, असं अजित पवार म्हणाले. तर औरंगजेब क्रूर, हिंदूद्वेष्टा नव्हता, असं जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत. त्यामुळे दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांच्या पक्षाच्या नेत्यांची ही विधाने महाराष्ट्राने हलक्यात घ्यावी का? ही एक औरंगजेबी चाल तर नाही ना? अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
हेही वाचा – “सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे स्त्रीलंपट…”, जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक ट्वीट
यावेळी त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीनचाकी सरकार आल्यानंतर हा नियोजनबद्ध कट रचलाय का? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला ‘टकमक टोकाकड’ घेऊन जात असून आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट होईल, असेही ते म्हणाले.