मुंबई : जेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हिंदूत्ववादी होते तेव्हा, दार उघड बये दार. हे जगदंबे चरणी गाणे म्हणत होते. मात्र जेव्हापासून त्यांनी हिंदूत्व सोडले त्या दिवसापासून ते दार खटखटाव भाई दार खटखटाव असा कार्यक्रम करीत आहेत. कधी ते तेजस्वी यादव, कधी केजरीवाल, कधी भारत राष्ट्र समिती अशाच प्रकारे आता ते राहुल गांधींचेही दार खटखटवायला जातील, अशी टीका मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशीष शेलार यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जेव्हा उद्धव ठाकरे चालत होते तेव्हा प्रत्येक जण ‘मातोश्री’वर जात होता. ‘मातोश्री’चा आदर होता पण ज्या दिवशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले त्या दिवसापासून त्यांना मतांसाठी अनेकांच्या दारोदारी भटकावे लागते आहे. ‘मातोश्री’चे महत्त्व त्यांनीच कमी केले, अशी टीका आमदार शेलार यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर जे बोलत आहेत हे म्हणजे तुफान आण्यापूर्वीची भीती आहे. शहा येणार म्हणजे तुफान येणार त्यामुळे छोटया छोटया बिळात राहणारे प्राणी चिवचिवाट करीत आहेत, असा टोलाही शेलार यांनी लगावला.