मुंबई : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने अद्याप अधिकृत घोषणा केली नसली, तरी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मतदारसंघ बांधणी व निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे. प्रसिद्ध अभिनेता सलमान खानशी असलेले वितुष्ट संपवून शेलार यांनी त्याच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आहेत. मतदारसंघातील मान्यवरांच्या व सेलिब्रिटींच्या भेटीगाठींना त्यांनी सुरुवात केली आहे.
उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपने पूनम महाजन यांना उमेदवारी दिली नसून शेलार यांना उमेदवारीचा आग्रह वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. शेलार यांना महाराष्ट्रातील राजकारणातच रस असला तरी त्यांना वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहामुळे अन्य पर्याय नसल्याची जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक तयारीस सुरुवात केली असून रविवारी वांद्रे (प.) विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा समन्वय मेळावा रविवारी घेतला.
हेही वाच – ममतादीदींच्या भाच्यासमोर कोणाचं आव्हान? डायमंड हार्बर कोण जिंकणार?
सलमान खान यांच्याबरोबर शेलार यांचे वितुष्ट होते. काँग्रेसचे माजी आमदार व सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबरोबर असलेले बाबा सिद्दीकी यांचे सलमान खानशी चांगले संबंध आहेत. सलमानने २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेलार यांच्या विरोधात सिद्दीकी यांचा प्रचार केला होता. बाबा सिद्दीकी यांनी शेलार यांचा सुमारे १७०० हून अधिक मतांनी पराभव केला होता. तेव्हापासून शेलार यांचे सलमानशी संबंध ताणलेलेच होते. सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांत सलमान व शेलार यांच्यात संवाद सुरू झाला होता. शेलार यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि रविवारी त्याच्या निवासस्थानी जाऊन भोजनही केले.
उत्तर मध्य मतदारसंघात मुस्लिम व ख्रिश्चन मतदारांची संख्या सहा लाखांहून अधिक आहे आणि सेलिब्रिटींची संख्याही मोठी आहे. शेलार यांचे सलमानशी मैत्रीचे सूर जुळल्याने तो शेलार यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारातही मदत करण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध अभिनेता गोविंदा यानेही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारास सुरुवात केली आहे. शेलार यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवून निवडणूक प्रचाराची आखणी सुरू केली आहे. गुढीपाडव्यानिमित्त मतदारसंघात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले असून हिंदुत्वाची गुढी उभारण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.