मुंबई : राज्यभरात चित्रपट चित्रीकरण परवानगी देण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी गुरुवारी दिले. राज्यात जास्तीत जास्त चित्रपटांची निर्मिती व्हावी, या क्षेत्राला चालना मिळावी आणि त्यातून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी ही एक खिडकी योजना राबवून चित्रीकरण परवानग्या देण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, असे शेलार यांनी नमूद केले. शेलार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर खात्याची आढावा बैठक घेतली. सांस्कृतिक कार्य विभाग राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याबरोबरच समाज प्रबोधनाचे कार्य करतो. या बैठकीस सांस्कृतिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत १०० दिवसांचा कार्यक्रम, विभागाच्या योजना व प्रकल्प आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. एक खिडकी योजनेअंतर्गत चित्रीकरणासाठी तयार करण्यात आलेली ऑनलाइन प्रणाली लागू करणे, पु. ल. देशपांडे कला अकादमीचा पुनर्विकास व उद्घाटन कार्यक्रम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेष प्रकाशन सोहळा आयोजन, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा, अशा विविध विषयांवर शेलार यांनी चर्चा केली.