भाजप नेते नितीन गडकरी यांच्या मर्जीतील भाजप आमदार आशिष शेलार यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर पुण्याच्या अध्यक्षपदी गोपीनाथ मुंडे गटाचे अनिल शिरोळे यांची नेमणूक करण्यात आली. मुंबई भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत विद्यमान अध्यक्ष राज पुरोहित तसेच सुनील राणे यांची नावे आशिष शेलार यांच्या बरोबरीने घेतली जात होती. आशिष शेलार यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यामुळे मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सुनील राणे यांच्याकडे सोपवली जाईल, अशी अटकळ होती. मात्र गोव्यात लालकृष्ण आडवाणी यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये राजकीय भूकंप होत असतानाच महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार व अनिल शिरोळे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
शेलार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे व नितीन गडकरी यांच्या जवळचे आहेत तर अनिल शिरोळे मुंडे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे मुंबई व पुणे भाजप अध्यक्षपदाची गडकरी व मुंडे गटात वाटणी झाल्याची चर्चा भाजप वर्तुळातच होत आहे.
अभाविप, भाजप मुंबई युवा अध्यक्ष, नगरसेवक ते विधान परिषद असा शेलार यांचा प्रवास असून आगामी लोकसभा
व विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तरुण मराठी चेहरा भाजपने दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा