मुंबई : मुंबई उपनगरसारख्या प्रगत जिल्ह्यात कुपोषित बालके तपासात आढळणे, ही बाब चिंताजनक असून त्यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना निश्चित करून १० दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी गुरुवारी दिले. अंगणवाडी सेविकांच्या प्राथमिक पाहणीत १६,३४३ बालके कुपोषित असल्याचे निदर्शनास आल्याने शेलार यांच्या अध्यक्षतेखाली उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यासह महिला व बालविकास विभाग आणि मुंबई महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुंबई उपनगरातील एकात्मिक बालविकास सेवा विकास यंत्रणेच्या पोषण ट्रॅकर अॅपवर फेब्रुवारी २०२५ मध्ये एकूण २ लाख ३८ हजार ९४ बालकांची नोंद घेतली गेली. यातील २ लाख ३४ हजार ८९६ बालकांची वजन आणि उंची मोजण्यात आली. त्यानुसार अंगणवाडी सेविकांनी अतितीव्र कुपोषण म्हणून २ हजार ८८७ तर मध्यम तीव्र कुपोषण म्हणून १३ हजार ४५७ बालकांची नोंद केली आहे. कुपोषण निर्मूलनासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणीला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, तपासणीअंती आढळणाऱ्या सर्व तीव्र कुपोषित बालकांसाठी लवकरच अधिक शहरी बालविकास केंद्रे सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.