Anant Ambani Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळ्याची धूम सध्या सुरु आहे. मुंबईतल्या मुकेश अंबानींच्या निवासस्थानी बॉलिवूड सेलिब्रिटींसह राजकीय क्षेत्र आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर त्यांच्या घरी उपस्थित आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे यांचा लग्न सोहळ्यात डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरुन भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटात खडाजंगी झाली आहे.
आशिष शेलार यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत तेजस ठाकरेंवर टीका केली. तर आज सुषमा अंधारेंनी त्यांना पोस्ट करत उत्तर दिलं. अंबानींच्या घरचं लग्न, त्यातला तेजस ठाकरेंचा डान्स आणि दोन नेत्यांमध्ये सोशल मीडियावर ही खडाजंगी पाहण्यास मिळाली. अमृता फडणवीस यांचं नाव घेत सुषमा अंधारेंनी भाजपाच्या आशिष शेलारांना उत्तर दिलं आहे.
हे पण वाचा- Sushma Andhare on Devendra Fadnavis: ठाकरे-फडणवीसांची भेट, सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या,
काय म्हणाले होते आशिष शेलार?
जो मराठी तरुण “गोविंद रे गोपाळा” म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही. ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत थिरकले नाहीत. जो होळीला “आयना का बायना..” म्हणताना कधी दिसला नाही. “गणा धाव रे… मला पाव रे..” म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही. तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला…! हा भन्नाट नृत्य अविष्कार पाहून महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात “धकधक” झाले. असो..हे नृत्य पण कसे “जगविख्यात, गरजेचे आणि जीवनावश्यक..वगैरे वगैरे आहे, हे आता त्या तरुणाचे “संजयकाका” महाराष्ट्राला पटवून देतीलच! असं म्हणत आशिष शेलार यांनी टीका केली होती. त्यावर आता सुषमा अंधारेंनी त्यांना उत्तर दिलं आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
“तोरणादारी-मरणादारी वैर मनात ठेवू नये म्हणतात असो हे समजायला संस्कार लागतात. ज्याची तुमच्याकडे वानवा आहे. अमृताहिनी जशा राजकारणात नाहीत. त्यांना वैयक्तिक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे तसंच आहे ते. बाय द वे तुम्हाला भांडी घासायलाही बोलावलं नाही का ?” असा खोचक प्रश्न सुषमा अंधारेंनी विचारला आहे.
तेजस ठाकरेंचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ भाजपाच्या नेत्यांनी पोस्ट केला आणि ठाकरे कुटुंबावर टीका केली. त्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार यांच्या पोस्टला खरमरीत शब्दांत उत्तर दिलं आहे. यावरुन आता भाजपाचे नेते पुढे आणखी काही बोलणार का? की या वादावर पडदा पडणार? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.