महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर राज्यपाल कोश्यारी त्यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदे व आमिषे देऊन लढाईला उतरणे ही काही मर्दुमकी नाही, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पंतप्रधान मोदींवर करण्यात आली होती. या टीकेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून बरीच ‘ऍसिडिटी’ फ्लश झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा – “दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी असल्याने…”; संजय राऊतांचं CM शिंदेंवर टीकास्र!
नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?
‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेला आशिष शेलार यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘‘तपास यंत्रणा शिवसेनेला आता विंचू, मगरी सारख्या वाटतात. पण २५ वर्षे मुंबईकरांचे रक्त शोषून भ्रष्टाचार केला त्याचं काय? शिवसेना नेमकी कोणत्या गोल्डन गँग विषयी इशारे करत आहे?” अशा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच ‘‘याकूब, नवाब, हसीना पारकर, सरदार शहावली खान ही तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडली”, असेही ते म्हणाले.
‘‘बरीच ‘ऍसिडिट फ्लश झाली”
‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छातीठोकपणे सांगितलं, की ‘एक अकेला कितनों पर भारी है…!’ हे शब्द काही जणांसाठी ‘धौतीयोग’ सारखे लागले आहेत. ज्यांना ही मात्रा लागू पडली, त्यांना मळमळ, जळजळ होणारच. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून बरीच ‘ऍसिडिटी” फ्लश झाली आहे”, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा – “हिंमत असेल, तर एकत्र निवडणुका घ्या”, उद्धव ठाकरेंच्या विधानाचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला समाचार; म्हणाले…
शिवसेनेनं नेमकं काय म्हटलं होतं?
‘‘पंतप्रधान मोदी छातीवर मूठ मारून जे सांगतात की, ‘मैं अकेला लढ रहा हूं और सबको भारी पड रहा हूं’ हे काही खरे नाही. विरोधकांच्या अंगावर फेकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचे साप, विंचू, मगरी वगैरे त्यांनी पाळून ठेवले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर राज्यपाल कोश्यारी त्यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदे व आमिषे देऊन लढाईला उतरणे ही काही मर्दुमकी नाही”, अशी टीका सामनातून करण्यात आली होती. तसेच ‘‘हाती पोलीस, न्यायालय, केंद्रीय तपास यंत्रणांची फौज ठेवून ‘मी एकटाच लढत आहे व सगळ्यांना भारी पडत आहे’ असे सांगणे मजेशीर आहे व ही मजा फक्त मोदीच करू शकतात. अशी मजा आपल्या देशात गेली सात-आठ वर्षे सुरूच आहे,” असा टोलाही पंतप्रधान मोदींना लगावण्यात आला होता.