आशीष शेलारांची आदित्य ठाकरेंवर जळजळीत टीका

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वांद्रे येथील थीम पार्क, मनोरंजन उद्यान आणि फुटबॉल मैदानाचे श्रेय घेण्याच्या मुद्दय़ावरून भाजपचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गेली काही वर्षे केलेल्या प्रयत्नांमुळे ही कामे आपण केली असताना आदित्य ठाकरे हे ‘आयत्या बिळावर..’ श्रेय लाटण्यासाठी पुढे आले असल्याची जहरी टीका शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. पक्षाच्या नेतृत्वावर हल्ला होऊनही शिवसेना नेत्यांनी मौन पाळणे पसंत केले असून कोणतेही प्रत्युत्तर दिलेले नाही.

अ‍ॅड. शेलार हे शिवसेनेवर आक्रमकपणे टीका करीत असतात आणि त्यांच्याच मतदारसंघातील मैदान व थीम पार्कच्या श्रेयावरून आता वाद उफाळून आला आहे. आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन भाजप नेत्यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न शिवसेना नेत्यांकडून होत असल्याने भाजप नेतृत्वाच्या सूचनेवरून थेट ठाकरे यांच्यावरच शेलार यांनी हल्ला चढविला असल्याचे सूत्रांनी सांगितले. वांद्रे येथील एक मैदान फुटबॉल असोसिएशनला देण्यासाठी आपण २०११ पासून प्रयत्नशील होतो व त्याबाबत म्हाडाने दिलेले पत्र व पैसे भरल्याच्या पावत्या शेलार यांनी सादर केल्या आहेत. हे मैदान फुटबॉल असोसिएशनला देण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा मध्येच आदित्य ठाकरे यांनी पत्र देऊन त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्या ठिकाणी हे काम आपणच केल्याचे फलकही ठाकरे यांनी लावल्यामुळे शेलार यांनी ही संतप्त प्रतिक्रिया नोंदविली आहे.

शेलार यांनी वांद्रे रेक्लमेशन येथे अतिशय उंच तिरंगा ध्वज उभारला असून त्याच्याजवळ मनोरंजन उद्यान, थीम पार्कची उभारणी केली जाणार आहे. त्या थीम पार्कचे संकल्पचित्रच शेलार यांनी सादर केले आहे. राज्य रस्तेविकास महामंडळाची ही जागा असून त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी दिलेले पत्र, त्यानंतर दिले गेलेले आदेश आदी तपशील शेलार यांनी उघड केला आहे. तरीही आदित्य ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ िशदे यांना पत्र देऊन या प्रकल्पांचे श्रेय लाटण्याचे उद्योग सुरू केल्याने शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून शरसंधान केले आहे.हे आयत्या बिळावर कुठून आले? माझ्या मतदारसंघातील कामे करून दाखवायला मी कुणाचीही नियुक्ती केलेली नाही. मतदारांनी मला निवडून दिले आहे, अशी बोचरी टीका शेलार यांनी आदित्य यांचा ‘युवराज’ असा उल्लेख करून केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish shelar slam pon aditya thackeray