भाजपा आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात ‘कलंक’ शब्दावरून चांगलाच कलगीतुरा रंगलेला गेल्या आठवड्यात सर्वांनी पाहिला. नागपुरातील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राला लागलेला कलंक असा उल्लेख केला होता. त्यावर भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी केलेली आंदोलनं आणि नेत्यांनी टीकाही केली. त्यावर प्रतिक्रिया देताना मी त्या उल्लेखावर ठाम असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ‘आमच्या पक्षात या नाहीतर, तुरुंगात जा,’ ही भाजपाची प्रवृत्ती देशाला व राज्याला कलंक असून माझ्या बोलण्याने तुमच्या तळपायाची आग मस्तकात का गेली, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्र भाजपाचे बहुतांश नेते उद्धव ठाकरेंवर तुटून पडले. काही नेते अजूनही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. भाजपा नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी एक ट्वीट करून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. शेलार यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, गिफ्ट सिटीचे मुंबईला मिळालेले गिफ्ट ‘त्यांनी’ घालवले, भाजपाने ते परत मिळवले. बुलेट ट्रेनला ‘त्यांनी’ विरोध केला, भाजपाने आपला संकल्प कायम ठेवला.

शेलार यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, मुंबई -दिल्ली कॉरिडॉरला त्यांनी (उद्धव ठाकरे) विरोध केला, भाजपाने विकासाचा मार्ग नाही सोडला. भाजपाने त्यांच्या विरोधाला न जुमानता कोस्टल रोडचा आपला संकल्प प्रत्यक्षात उतरवला. मुंबईकरांच्या मेट्रोलाही त्यांचा विरोध होताच, पण भाजपाने मेट्रो रुळावर आणलीच. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला आयआयएम दिली, प्रत्येक वेळी विरोध करणारे ते कपाळ करंटे त्यातही शिंकतील! म्हणून तमाम मुंबईकर हो! त्यांचे पब, पार्टी, पेंग्विनवाले स्वार्थाचे आणि मुंबईला उध्दवस्त करणारे राजकारण ओळखा आणि चला मुंबईला भरभरून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत विकासाची एक वाट चालूया!

हे ही वाचा >> विधानसभा अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळेल? राज ठाकरेंचं एका शब्दात उत्तर, म्हणाले…

भारतीय जनता युवा मोर्चाने मुंबईतील सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधणारी ‘एक सही भविष्यासाठी’ ही मोहीम सुरू केली आहे. यात सहभागी होण्याचं आवाहन करणाऱ्या ट्वीटमध्ये शेलार यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे.