महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी अज्ञातांनी हल्ला केला होता. संदीप देशपांडे मुंबई महापालिकेतील घोटाळे बाहेर काढणार होते, त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा मनसेने केला होता. यावरून आता भाजपा मुंबई अध्यक्ष अॅड आशिष शेलार यांनी घणाघात केला आहे. मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचारावरून शेलारांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे.
“मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उबाठाला एवढी का मिरची झोंबते? मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करता? किती स्टंप आणि बॅट तुमच्याकडे आहेत?”, असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला आहे. त्यांनी ट्वीट करत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा >> विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे जाणार? अमोल मिटकरी म्हणाले, “भाजपाची कोंडी करायची असेल तर…”
“मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारच मानायला हवेत, त्यांनी चौकशी लावून तुमचे “कटकमिशनचे उद्योग मुंबईकरांसमोर उघडे पाडायचे ठरवलेय! तेव्हा तर दीड कोटी मुंबईकरसुद्धा तुम्हाला हिशेब विचारणार आहेत, तेवढे स्टंप आणि बॅट आहेत का तुमच्याकडे?”, असा सवालही शेलारांनी उपस्थित केला.
“आम्ही तर रोज विचारणार.. कोविडमध्ये “कफना”त पण “कट कमिशन कोणी खाल्ले? औषधांवरची मलाई कुणी खाल्ली? रस्त्यावरचे डांबर, नाल्यातील गाळ, शाळेतील मुलांच्या वस्तू यामध्ये कोट्यवधी कुणी लाटले? या स्टंप घेऊन आम्ही पण तयार आहोत!!”, असं शेलार म्हणाले.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने १५० चे टार्गेट ठरवले आहे. मिशनच्या अंमलबजावणीसाठी पक्षाच्यावतीने जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.त्यामुळे मुंबईत केंद्रीय मंत्र्यांचेही दौरे वाढले आहेत.