मुंबईत शनिवारी ( २४ जून ) झालेल्या पावसाने अनेक भाग जलमय झाले. याच मुद्द्यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच, “आमच्याकार्यकाळात ३०० मिमी आणि ४०० मिमी तासाला पाऊस पडत होता. तेव्हा मी, महापौर किंवा उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरून प्रश्न सोडवत होतो,” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. या विधानावरून मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्वीट करत आशिष शेलार म्हणाले, “तमाशामधील आबुराव आणि बाबुराव एकापेक्षा एक फेकम फाक करुन मनोरंजन करतात. उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत. काल ‘मातोश्री’च्या युवराजांनी बाबुरावची जागा घेतली. म्हणे, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला ४०० मिमी पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले.”

हेही वाचा : “तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा पंढरपूरच्या वारीला येताना मटणाचा बेत!”, आमदार अमोल मिटकरींचा संताप, म्हणाले…

“मुंबईत एका तासात ४०० मिमी? कधी एवढा पाऊस पडला? युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? मुंबईत २६ जुलै २००५ ला पण एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता. यांची फेकंम् फाक तर त्या आबुराव, बाबुरावपेक्षा ही भयंकर!,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं.

“मुंबईकर हो, दोष युवराजांचा नाही, ‘मातोश्री’च्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे मुंबईच्या पावसावर बोलणार तर असेच होणार ना? म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना… इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन वो कागज कि कश्ती, वो बारिश का पानी!,” असेही आशिष शेलार म्हणाले.

हेही वाचा : “आदरणीय पवारसाहेब, पोरकट…”, चंद्रशेखर बावनकुळेंचं शरद पवारांना खोचक प्रत्युत्तर!

दरम्यान, ‘पाऊस झाला याचं स्वागत करा, पाणी साचलं ही तक्रार काय करता,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली होती. या विधानावरून आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. “मुख्यमंत्र्यांनी केलेलं हे विधान निर्लज्जपणाचं, नाकर्तेपणाचं आहे. भ्रष्टाचाराचा कोणता चेहरा असेल, तर हे खोके सरकार आहे,” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.