मुंबई : आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजणाऱ्या, व्यावसायिकरित्या यश मिळवणाऱ्या मराठी चित्रपटांना सातामुद्रापार ओळख मिळावी, या उद्देशाने पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘चित्रपताका’ या नावाने राज्याचा पहिला मराठी चित्रपट महोत्सव २१ ते २४ एप्रिलदरम्यान पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे होणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मंगळवारी केली.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी चित्रपट महोत्सवाच्या नावासह त्याच्या बोधचिन्हाचे अनावरण ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार- मुख्य लेखा वित्त अधिकारी चित्रलेखा खातू रावराणे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, तसेच या महोत्सवाचे संचालक ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे उपस्थित होते.
‘मराठी चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधीत्व करणारी एक झळाळती पताका म्हणजेच ‘चित्रपताका’ ही संकल्पना या महोत्सवामागे आहे. महोत्सवाचे बोधचिन्ह विचारपूर्वक करण्यात आले असून घोड्यावर बसलेला, हातात चित्रपताका आणि रिळ स्वरूपातील ढाल घेऊन अटकेपार निघालेला मावळा म्हणजे तमाम मराठी चित्रपटकर्मी, अशी या बोधचिन्हाची रुपकात्मक मांडणी करण्यात आली आहे’, असेही ॲड. शेलार यांनी स्पष्ट केले. या चार दिवसांच्या चित्रपट महोत्सवात पूर्ण लांबीचे, गेल्या पाच वर्षांत सेन्सॉरसंमत झालेले, विविध शैलीतील ४१ दर्जेदार मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. याशिवाय, चित्रपटांशी संबंधित विविध विषयांवर पाच परिसंवाद, दोन मुलाखती, दोन कार्यशाळा, सिने पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा, मराठी चित्रपटांविषयीचे खास प्रदर्शनही या महोत्सवात असणार आहे. हा महोत्सव विनामूल्य असून त्यासाठी ऑनलाईन वा पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे नावनोंदणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती देत अधिकाधिक चित्रपटप्रेमींनी महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहनही सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी केले.
पुढील वर्षभरात १२०० कार्यक्रमांचा संकल्प
सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून सूत्रे हातात घेतल्यानंतर शंभर दिवसांत कलाविषयक कार्यशाळा, लोककला – लोकवाद्यांचे महोत्सव, सिने – नाट्यसृष्टीविषयक १७० कार्यक्रम केले. आता एप्रिलपासून पुढच्या एप्रिलपर्यंत १२०० कार्यक्रम राज्यभरात करण्याचा मानस असल्याचे ॲड. शेलार यांनी स्पष्ट केले.
स्वरगंधर्व सुधीर फडके दृक्-श्राव्य दालनाचे उद्घाटन
पुनर्बांधणीनंतर दिमाखात उभ्या राहिलेल्या पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये अद्ययावत क्रोमा स्टुडिओ, ध्वनिमुद्रणासाठी सुसज्ज स्टुडिओ, संकलनासाठी पाच अद्ययावत कक्ष, दृकश्राव्य माध्यमाच्या अभ्यासकांसाठी दालन आणि एक प्रीव्ह्यू कक्ष उभारण्यात आला आहे. एकाच जागी वैविध्यपूर्ण व्यवस्था असलेल्या या दृक-श्राव्य दालनाला स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे नाव देण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन फडके यांचे चिरंजीव आणि प्रसिध्द गायक-संगीतकार श्रीधर फडके यांच्या हस्ते बुधवार, ९ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.