‘आदर्श’ घोटाळ्यामुळे प्रतिमा डागळली गेली असली तरी आपल्या प्रभावक्षेत्रात या घोटाळ्याचा काहीही परिणाम झालेला नाही हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड-वाघाळा महानगपालिकेची निवडणूक एकहाती जिंकून दाखवून दिले आहे. या यशानंतर तरी आपले राजकीय पुनर्वसन व्हावे, असा अशोकरावांचा प्रयत्न असला तरी न्यायालयीन निकाल लागेपर्यंत काँग्रेस पक्षश्रेष्ठी घाई करण्याची शक्यता नाही. काँग्रेसने सत्ता कायम राखली असली तरी नांदेडमध्ये मुस्लिम मसजिल या संघटनेला मिळालेल्या यशाबद्दल सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. पुणे स्फोटाच्या पाश्र्वभूमीवर मराठवाडय़ात झालेल्या धरपकडीची प्रतिक्रिया उमटली , अशी चर्चा सुरू झाली आहे.  नांदेड महापालिकेच्या ८१ पैकी ४१ जागा जिंकून काँग्रेसने सत्ता कायम राखली. अशोक चव्हाण यांना चांगल्या यशाची अपेक्षा होती. पण मुस्लिम मजलिस या हैदराबादस्थित संघटनेने काँग्रेसचे गणित बिघडविले. या पक्षाचे ११ उमेदवार विजयी झाले. नांदेडची निवडणूक अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठेची केली होती. गेले महिनाभर त्यांनी नांदेडमध्ये तळ ठोकला होता. ‘आदर्श’ घोटाळ्यामुळे मुख्यमंत्रीपद गमवाव्या लागलेल्या अशोकरावांना राज्याच्या राजकारणात सक्रिय व्हायचे आहे. विलासराव देशमुख यांच्या निधनाने मराठवाडय़ात पक्षाकडे नेतृत्वाची पोकळी तयार झाली आहे. ही पोकळी भरून काढण्याचा अशोक चव्हाण यांचा प्रयत्न आहे. नांदेडमध्ये मिळालेल्या यशाची पक्षाने दखल घ्यावी, असा अशोकरावांचा प्रयत्न आहे. ‘आदर्श’ची जमीन ही राज्य सरकारच्या मालकीची असल्याचे चौकशी आयोगाच्या अहवालातून प्रकाशात आले आहे. त्यामुळे अधिक चौकशीची आवश्यकताच नाही, अशी भूमिका अशोकरावांनी न्यायालयात मांडली आहे. ही निवडणकू जिंकल्याने नांदेडकरांचे प्रेम आपल्यावर कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. नांदेडच्या विकासासाठी केलेल्या कामांना जनतेने पावती दिल्याचेही त्यांचे म्हणणे होते. राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची घाई झालेल्या चव्हाण यांचा सध्या तरी डोळा प्रदेशाध्यक्षाच्या पदाकडे आहे. पण सीबीआय चौकशी आणि न्यायालयात प्रकरण न्यायप्रवीष्ठ असल्याने काँग्रेस हायकमांड लगेचच काही निर्णय घेईलच असे नाही. मात्र नांदेडची निवडणूक जिंकून अशोकरावांनी आपले महत्त्व वाढविले आहे. कै. विलासराव देशमुख यांनी लातूर, अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड, गणेश नाईक यांच्यामुळे नवी मुंबई यापाठोपाठ एकहाती महानगरपालिकेत सत्ता कायम राखण्यात अशोक चव्हाण हे यशस्वी झाले आहेत.     

मुस्लिम मजलिसचे यश
हैदराबादस्थित मुस्लिम मजलिस या पक्षाने ११ जागा जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या पक्षाच्या आंध्र प्रदेशमधील नेत्यांनी मुस्लिम वस्त्यांमध्ये चिथावणीखोर प्रचार केल्याचा आरोप काँग्रेसमधून केला जात आहे. नांदेडवर आंध्र प्रदेशचा पगडा असला तरी आतापर्यंत एवढे यश मजलिसला कधीच मिळाले नव्हते. पुणे बॉम्बस्फोटाबाबत मराठवाडय़ातील तीन युवकांना नुकतीच अटक झाली. तसेच चौकशीसाठी काही युवकांची धरपकड करण्यात आली होती. त्याची प्रतिक्रिया मुस्लिम वस्त्यांमध्ये उमटल्याचे सांगण्यात येते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये समाजवादी पक्षाला यश मिळाले होते. मुस्लिम समाज काँग्रेसपासून दूर चालला का, या प्रश्नावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नकारात्मक उत्तर दिले. भिवंडी, मालेगाव महापालिकांच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने काँग्रेसला पाठिंबा दिल्याचा दावा ठाकरे यांनी केला. या निवडणुकीत राष्ट्रवादीने सारी शक्ती पणाला लावूनही पक्षाला फारसे यश मिळालेले नाही. मात्र काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पाडण्याकरिता राष्ट्रवादीने मुस्लिम मजलिसला पडद्याआडून मदत केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते करीत आहेत.

Story img Loader