छाननी समितीत राज्यातील दोनच नेते

मधु कांबळे, मुंबई

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्याकरिता राज्यस्तरावरील छाननी समितीत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांचाच भरणा असून, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील या दोनच नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. दिल्लीचे वर्चस्व असलेल्या याच समितीकडून बहुतांश उमेदवारांची निवड केली जाणार असून केंद्रीय निवड समिती त्यावर फक्त मान्यतेची मोहोर उमटवणार आहे.

अखिल भारतीय काँग्रेस समितीने अलीकडेच लोकसभा निवडणुकीशी संबंधित प्रदेश काँग्रेस स्तरावर जाहीरनामा, प्रचार, माध्यम, अशा विविध समित्या स्थापन केल्या आहेत. गेल्या आठवडय़ात लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी महत्त्वाची असलेली छाननी समिती स्थापन केली आहे. सरचिटणीस व राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे. त्यात अखिल भारतीय समितीचे संघटक महासचिव के.सी. वेणुगोपाल तसेच पाच सचिव व राज्याचे सहप्रभारी हे सदस्य आहेत. या समितीत अशोक चव्हाण व राधाकृष्ण विखे-पाटील या राज्यातील फक्त दोनच नेत्यांचा समावेश आहे.

२०१४ मधील किंवा त्या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रदेश स्तरावरील छाननी समितीत राज्यातील आठ-दहा ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. राज्याचे प्रभारी समितीत असले तरी अखिल भारतीय समितीच्या संघटक सचिवांचा समावेश नव्हता. परंतु अशोक गेहलोत यांच्या जागी निवड झालेले संघटक महासचिव वेणुगोपाल यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. खरगे यांना साहाय्य करण्यासाठी आणखी पाच सहप्रभारी नेमले आहेत. त्यांनाही समितीचे सदस्य करण्यात आले आहे. समितीत दिल्लीचाच अधिक भरणा आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्येच दिल्ली दरबार भरून त्यात उमेदवारांची निवड केली जाणार असल्याचे मानले जात आहे.

निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निवडण्यासाठी छाननी समिती महत्त्वाची असते. याच समितीत बहुतांश उमेदवार निवडले जाणार आहेत. प्रदेश छाननी समितीने केलेल्या निवडीवर पक्षाच्या केंद्रीय निवड समितीची फक्त मान्यतेची मोहोर उमटवली जाणार आहे. राज्याचे सहप्रभारी आशीष दुआ यांनी त्याला दुजोरा दिला. एक-दोन उमेदवार निवडीचा प्रश्न असेल तर तो अखिल भारतीय समिती स्तरावर म्हणजे थेट अध्यक्ष राहुल गांधी यांच्या स्तरावर सोडविला जाणार आहे, असे सांगण्यात आले.

Story img Loader