राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी तर महापालिकेच्या निवडणुकीत अमराठी मतांवर डोळा ठेवून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी खासदार संजय निरुपम यांची नियुक्ती करण्यात आली.
राहुल गांधी यांच्या हाती लवकरच पक्षाची सूत्रे येणार आहेत. हे लक्षात घेऊन काँग्रेसने सोमवारी पाच राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबईच्या अध्यक्षांची निवड करताना राहुल यांना मान्य असलेल्या नेत्यांची नियुक्ती केली आहे. अशोक चव्हाण यांची सहा वर्षांंपूर्वी मुख्यमंत्रीपदी निवड ही राहुल गांधी यांच्यामुळेच झाली होती.
‘आदर्श’ आणि ‘पेडन्यूज’ यामुळे वादग्रस्त ठरलेल्या अशोक चव्हाण यांना पक्षाने गेली साडेचार वर्षे चार हात दूरच ठेवले होते. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी देण्यास तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध दर्शविला होता. ‘आदर्श’ चौकशी आयोगाने मदतीच्या बदल्यात फायदा उकळल्याचा ठपकाही चव्हाण यांच्यावर ठेवला होता. पक्षाकडे नेतृत्वाचा अभाव असल्यानचे अशोकरावांच्या नावाचा विचार झाला. प्रदेशाध्यक्षपदासाठी चव्हाण यांच्यासह नारायण राणे आणि हर्षवर्धन पाटील यांची नावे स्पर्धेत होती. राज्याचे नेतृत्व मराठा समाजातील नेत्याकडेच असावे हा विचार पुढे आला आणि मागे पक्षाला सत्ता मिळवून देणाऱ्या अशोकरावांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे दोन्ही नेते मराठा समाजाचे आहेत.
मराठीचा मुद्दा पुढे आल्याने यापूर्वी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी जनार्दन चांदूरकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण आगामी महापालिका निवडणुकीत मराठीबरोबरच अमराठी व विशेषत: उत्तर भारतीयांची मते लक्षात घेता माजी खासदार संजय निरुपम यांच्या नावाचा विचार झाला. शिवसेनेला टक्कर देण्याच्या उद्देशानेच पूर्वश्रमीचे शिवसैनिक असलेल्या निरुपम यांचा विचार झाला, असे सांगण्यात येते.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2015 रोजी प्रकाशित
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण
राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी तर महापालिकेच्या निवडणुकीत अमराठी मतांवर डोळा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-03-2015 at 03:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan appointed new maharashtra congress chief