एरव्ही प्रश्नोत्तराच्या तासातील एखादा प्रश्न नुसता चर्चेला आला तर त्याला राज्यमंत्रीही उत्तर देतात. पण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आरक्षित भूखंडाबाबत उपप्रश्न विचारला आणि सभागृहात उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उत्तर देणे मंगळवारी विधानसभेत भाग पडले. पाण्याच्या प्रश्नावर मराठवाडय़ातील आमदारांची गुरुवारी बोलाविलेली बैठक आणि समर्थक आमदारांच्या सरकारच्या विरोधातील हालचाली यांवरून गेले अडीच वर्षे काहीसे मवाळ असलेले अशोक चव्हाण हे अधिकच सक्रिय होऊ लागल्याचे मानले जात आहे.
विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून सोमवारी विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांनी गोंधळ घातला होता. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही माघार न घेणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक  चव्हाण यांच्या समर्थकांचा समावेश होता. अधिवेशनात अधूनमधून हजेरी लावणारे अशोक चव्हाण हे प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित होते. पुण्यातील भूखंड आरक्षणाबाबत भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी विचारलेल्या प्रश्नाला नगरविकास खात्याचे राज्यमंत्री उदय सामंत हे उत्तर देत होते. तेवढय़ात अशोक चव्हाण हे उपप्रश्न विचारण्याकरिता उभे राहिले आणि सारा नूरच बदलून गेला. विविध सुविधांसाठी आरक्षित असलेले भूखंड संपादित करण्याकरिता महापालिकांची आर्थिक ऐपत नसते. म्हणून सरकार त्यांना मदत करणार का, या अशोकरावांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावे लागले. त्यावर सरकार नियमात बदल करणार असून, सर्वच शहरांमध्ये विकास हस्तांतरण हक्क (टी.डी.आर.) लागू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले. अशोकरावांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर देण्यास भाग पाडल्याने विरोधकांनाही चेव आला आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यासह विरोधी सदस्यांनी उपप्रश्नांचा भडिमार केला.

मराठवाडय़ाचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न
पाण्यावरून मराठवाडा-नाशिक-नगर असा वाद सुरू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर यावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने गुरुवारी मराठवाडय़ातील सर्वपक्षीय आमदारांची बैठक मुख्यमंत्री चव्हाण यांच्याबरोबर आयोजित करण्यात आली आहे. मराठवाडय़ात नेतृत्वाची असलेली उणिव भरून काढण्याचा अशोकरावांचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. नाहक प्रादेशिक कटुता वाढू नये म्हणून बैठक बोलाविल्याचे अशोक चव्हाण यांचे म्हणणे आहे. ‘आदर्श’ घोटाळा चौकशी आयोगाचा अहवाल सरकारला सादर झाला असला तरी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात तो मांडण्याबाबत मुख्यमंत्री फारसे उत्सुक दिसत नाहीत. अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्रमक होण्यास ही किनार कारणीभूत असल्याचे काँग्रेसच्या वर्तुळात मानले जाते.

Story img Loader