विधान परिषदेच्या औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीसाठी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे या झांबड यांच्यामुळेच सहा वर्षांपूर्वी काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला होता, पण आर्थिकदृष्टय़ा बलवान म्हणून पक्षाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मतांची संख्या कागदावर जास्त असल्याने काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त होती. ही निवडणूक ‘लक्ष्मीदर्शना’वर होणार असल्याने काँग्रेसने झांबड यांना उमेदवारी दिली. झांबड यांनी २००७ मध्ये राष्ट्रवादीच्या वतीने निवडणूक लढविली होती आणि त्यांनी मतांचे विभाजन केल्यानेच काँग्रेसचे उमेदवार अब्दुल सत्तार यांचा पराभव झाला होता. मात्र झांबड यांच्याशिवाय पक्षापुढे पर्यायच नव्हता. शिवसेनेने विद्यमान आमदार तनवाणी यांनाच उमेदवारी दिली असून, त्यांच्यापुढे टिकाव लागण्याकरिता काँग्रेसने झांबड यांना रिंगणात उतरविले आहे.
‘आदर्श’ घोटाळ्यापासून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्षाने चार हात दूर ठेवले होते, पण अशोक चव्हाण हे अलीकडे जास्तच सक्रिय झाले आहेत. पक्षाच्या बैठकांना त्यांना आमंत्रित करण्यात येऊ लागले आहे. झांबड यांच्या उमेदवारीसाठी अशोक चव्हाण यांनी आग्रह धरला होता. पक्षाने अशोकरावांची मागणी मान्य केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा