काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं. ही भेट नेमकी कशासाठी घेण्यात आली याच्या कारणांविषयी तर्कवितर्क लावण्यात आले. यानंतर स्वतः अशोक चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत या भेटीमागील कारणं सांगितली. ते गुरुवारी (२८ जून) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
अशोक चव्हाण म्हणाले, “महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांची एकत्र निवडणूक लढण्याची मानसिकता आहेच. अजित पवारांचीही तशी अनुकुल भूमिका आहे. उद्धव ठाकरेंचीही तीच भूमिका आहे. १७ जुलैपासून अधिवेशन आहे. त्याआधी आम्हाला एकत्र बसायचं आहे. अधिवेशनाचा अजेंडा काय असावा याविषयीही चर्चा झाली.”
“काँग्रेसमधील चर्चेची माहिती अजित पवारांना दिली”
“या भेटीत मी लोकसभेच्या पूर्वतयारीसंदर्भात काँग्रेसमध्ये आतापर्यंत जी काही चर्चा झाली त्याची माहिती अजित पवारांना दिली. याशिवाय विधानसभा पूर्वतयारीची मविआची बैठक आम्हाला घ्यायची आहे. ती बैठक कधी घ्यायची यावरही चर्चा झाली,” अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
“जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही”
“कोण कोणती जागा लढवणार अशी जागानिहाय चर्चा झाली नाही. तसा प्रश्नच नाही, कारण तशी चर्चा व्हायची असेल तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ नेते आणि मी असे तिघे असू तेव्हाच याबाबत चर्चा होऊ शकते. आज केवळ काय विचार आहे यावरच चर्चा झाली. जागावाटपाबाबत कोणतीही सखोल चर्चा झालेली नाही. काय करणं सोयीचं राहील अशी चर्चा झाली,” असंही अशोक चव्हाणांनी नमूद केलं.
“तिघांनाही तडजोड करावी लागेल”
ज्या जागांवर आमचा खासदार त्या जागा आम्हालाच हव्या, अशी शिवसेनेची भूमिका असल्याची चर्चा आहे. त्यावर अशोक चव्हाण म्हणाले, “ज्या जागांवर आमचा खासदार त्या जागा आम्हालाच हव्या, असं अद्याप काहीही नाही. हे त्यांच्याकडील मत आहे. एकदा चर्चेला बसलं की तोही विषय मार्गी लागू शकतो. राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्या स्थितीनुसार, तिघांनाही तडजोड करावी लागेल. राज्यातील राजकीय परिस्थिती आणि मेरिट (निवडून येण्याची क्षमता) या दोन्ही गोष्टींचा विचार झाला तर योग्य होईल.”
हेही वाचा : प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहण्यावरून रामदास आठवले म्हणाले, “मुद्दाम काहीतरी खोड…”
“जे खासदार अन्य पक्षात गेले आहेत तिथली…”
विद्यमान खासदारांच्या जागा तशाच राहतील, केवळ शिवसेनेचे (ठाकरे गट) जे खासदार निघून गेले त्यावर काय चर्चा झाली? या प्रश्नावर अशोक चव्हाण म्हणाले, “ज्या जागांवर खासदार निवडून आले आणि जे खासदार त्या पक्षात आहेत तिथं काही अडचण येईल असं मला वाटत नाही. जे खासदार अन्य पक्षात गेले आहेत तिथली सध्याची काय परिस्थिती आहे हा विषय आहे. तसं होणार नाही, असं मी म्हणत नाही. परंतु तेथील राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेणं अपेक्षित आहे, असं वाटतं.”