कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १४ व्या ‘कोकण मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांची निवड करण्यात आली आहे. ‘कोमसाप’च्या संमेलन समितीच्या रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत नायगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली. ‘कोमसाप’च्या संमेलनाध्यक्षपदासाठी गेली १३ वर्षे निवडणूक न होता एकमताने निवड केली जात आहे.
७ ते ९ डिसेंबर या कालावधीत दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाच्या परिसरात हे संमेलन होणार असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे मावळते अध्यक्ष दिनकर गांगल हे नायगावकर यांच्याकडे संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे सुपुर्द करणार असल्याची माहिती ‘कोमसाप’च्या कार्याध्यक्षा नमिता कीर आणि संमेलन समितीचे प्रमुख रवींद्र आवटी यांनी दिली.
संमेलन स्थळाला ‘श्री. ना. पेंडसे साहित्य नगरी’ तर मुख्य व्यासपीठाला ‘सानेगुरुजी साहित्य मंच’ असे नाव देण्यात येणार आहे. तीन दिवसांच्या संमेलनात चर्चा, परिसंवाद, कवी संमेलन आदी विविध कार्यक्रम होणार असून त्यात प्रभा गणोरकर, डॉ. नागनाथ कोतापल्ले, फ. मु. शिंदे, रामदास फुटाणे, विश्वास पाटील, विष्णु सूर्या वाघ, फैय्याज, अशोक पत्की आणि अन्य मान्यवर सहभागी होणार आहेत.  संमेलनासाठी विविध जिल्ह्यातील ‘कोमसाप’च्या सदस्यांसाठी काही प्रमुख ठिकाणांहून दापोली येथे जाण्याासाठी विनाशुल्क बस गाडय़ांची व्यवस्था करण्यात येणार आहे. ‘कोमसाप’च्या जिल्ह्याध्यक्षांकडे त्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा