प्रथितयश नाटककार अशोक पाटोळे यांचे मंगळवारी पहाटे दीर्घ आजाराने मुंबईत जसलोक रुग्णालयात निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. पाटोळे यांच्या अंतिम इच्छेनुसार अंत्यसंस्कार न करता देहदान करण्यात आले. त्यांचे पार्थिव केईएम रुग्णालयाकडे सुपूर्द केले गेले.
पाटोळे हे नाटककार म्हणून विशेष प्रसिद्ध असले तरी त्यांनी एकांकिका, कथा, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका असे विविध प्रकारचे लेखन केले होते. ‘मी माझ्या मुलांचा’, ‘देखणी बायको दुसऱ्याची’, ‘शामची मम्मी’, ‘आई रिटायर होतेय’ ही त्यांची काही गाजलेली नाटके. ‘आई रिटायर होते’ हे नाटक गुजराती आणि हिंदीतही अनुवादित होऊन रंगभूमीवर सादर झाले होते. ‘एक चावट संध्याकाळ’ हे त्यांचे नाटक वादग्रस्त ठरले. ‘आई तुला मी कुठे ठेवू’ हे त्यांचे अलीकडचे नाटक असून त्याचे सध्या प्रयोग होत आहेत.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या मुंबई विभागीय पातळीवरील अंतिम फेरीला परीक्षक म्हणून ते उपस्थित होते. पाटोळे यांनी लिहिलेले आणि डिम्पल प्रकाशनने प्रकाशित केलेले ‘एक जन्म पुरला नाही’ हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे.
अल्पपरिचय
पाटोळे यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथील. ५ जून १९४८ रोजी जन्मलेल्या पाटोळे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील विल्सन हायस्कूल येथे झाले. त्यांनी लिहिलेली पहिली कथा ‘नवाकाळ’ या दैनिकात प्रकाशित झाली होती. पुढे ‘श्री दीपलक्ष्मी’, साप्ताहिक मार्मिक’ आदी नियतकालिकांमधूनही त्यांनी लिहिलेल्या विनोदी कथा प्रकाशित झाल्या होत्या. ‘झोपा आता गुपचूप’ हे त्यांचे पहिले नाटक. पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘अधांतर’, ‘हद्दपार’, ‘ह्य़ांचा हसविण्याचा धंदा’, ‘अध्यात ना मध्यात’ आदी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे लेखनही त्यांनी केले होते. म्
‘श्रीमान श्रीमती’, ‘चुनौती’ या हिंदी मालिकेचे लेखनही पाटोळे यांनी केले होते. ‘सातव्या मुलीची सातवी’ मुलगी हा कथासंग्रह, ‘पाटोळ्यांच्या पाचोळ्या’ हा कवितासंग्रही प्रसिद्ध झाला आहे. ‘माझा पती करोडपती’ या चित्रपटाची पटकथा-संवाद पाटोळे यांचे होते. चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन, अभिनय यांची त्यांना आवड होती. ‘ बीपीटी’च्या ‘एकटा जीव सदाशिव’ या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती.
पाटोळे यांची अन्य नाटके
‘बे दुणे पाच’, ‘दांडेकरांचा सल्ला’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’, ‘तांदूळ निवडता निवडता’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘अग्निदिव्य’, ‘दुर्गाबाई जरा जपून’, ‘माणसा माणसा हूप’, ‘प्रेम म्हणजे लव्ह असतं’, ‘चारचौघांच्या साक्षीने’.
आदरांजली
पाटोळे यांचे आत्मचरित्र ‘एक जन्म पुरला नाही’ येत्या १५ मे रोजी विशेष कार्यक्रमात प्रकाशित करण्याचे ठरविले होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे पाटोळे कार्यक्रमाला येऊ शकणार नसल्याने आम्ही कार्यक्रम रद्द केला होता. कार्यक्रम रद्द झाला असला तरी तयार झालेले हे पुस्तक पाटोळे यांनी पाहिले, यातच समाधान आहे.
अशोक मुळ्ये (डिम्पल प्रकाशन)
अत्यंत बोलक्या स्वभावाचे पाटोळे हे माझे जवळचे मित्र होते. माझ्या खेरीज मी दुसऱ्यांची जी नाटके केली त्यात पाटोळे हे एकमेव होते. त्याची चार नाटके मी केली. सर्वच चालली पण ‘शामची मम्मी’ हे नाटक विशेष गाजले.
पुरुषोत्तम बेर्डे (दिग्दर्शक-निर्माते)